सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा, कोयना धरणात पाण्याची आवक वाढली


सातारा जिल्ह्यात तीन दिवस

मुसळधार पावसाचा इशारा

कोयना धरणात पाण्याची आवक वाढली

संतोष शिराळे, सातारा : 

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून ४ ते ६ जुलै या कालावधीत सातारा जिल्ह्यासह मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सातारा, पुणे आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत घाट रस्त्यांवर दरडी कोसळणे, सखल भागात पाणी साचणे, स्थानिक वाहतुकीत अडथळे तसेच किरकोळ संरचनात्मक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि आवश्यक असल्यास खबरदारी घेऊनच प्रवास करावा.

दरम्यान, सातारा जिल्ह्याला जीवनदायिनी असलेल्या कोयना धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे. आज (३ जुलै) सायंकाळी ५ वाजेपर्यंत धरणाची पाणीपातळी २०४६.१० फूट (६२३.८७५ मीटर) इतकी नोंदविण्यात आली आहे.

कोयना धरणाची स्थिती : एकूण पाणीसाठा १६.६० टीएमसी (१५.७७%) तर उपयुक्त पाणीसाठा: ११.४८ टीएमसी (११.४६%) आहे. २४ तासात कोयना – ८७ मिमी, नवजा – ६० मिमी, महाबळेश्वर – ७८ मिमी पाऊस झाला असून, 

धरणात १३,१०२ क्युसेक (१.१३ टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. प्रशासनाने नागरिकांना नदी, ओढे, धबधबे आणि पूरप्रवण ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहन केले असून, हवामान विभाग व जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments