डिजिटल व्यवहार, क्रेडिट कार्डचा
वापर करून व्यवसायाचा विस्तार
करा : नगराध्यक्ष अमोल मोहिते
पथविक्रेत्यांच्या लोककल्याण मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
५५८४ लाभार्थ्यांना ८.९९ कोटींचे कर्जवाटप
संतोष शिराळे, सातारा |
सातारा शहरात आजपर्यंत ५,५८४ पथविक्रेत्यांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ देण्यात आला असून त्यांना एकूण ८ कोटी ९९ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. लाभार्थी नियमित कर्जफेड करत आहेत. पथविक्रेत्यांनी पुढील टप्प्यातील कर्जाचा लाभ घ्यावा. डिजिटल व्यवहार आणि क्रेडिट कार्डचा अधिकाधिक वापर करून व्यवसायाचा विस्तार करावा, असे आवाहन नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी केले.
पंतप्रधान आत्मनिर्भर स्वनिधी (PM SVANidhi) योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या पथविक्रेते व लघु व्यावसायिकांसाठी सातारा नगर परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लोककल्याण मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दि. ३० जून रोजी सोनचिरैया कार्यालय (पहिला मजला), राजवाडा कार्यालय येथे झालेल्या या मेळाव्यात शेकडो लाभार्थ्यांनी सहभाग घेत शासनाच्या विविध योजनांची माहिती घेतली.
मेळाव्याचे उद्घाटन नगराध्यक्ष अमोल मोहिते, नियोजन सभापती अशोक शेडगे, महिला व बालकल्याण समिती सभापती मोनिका घोरपडे, उपसभापती सुजाता गिरी गोसावी, नगरसेविका दिनाज शेख, हेमलता भोसले, पंजाब नॅशनल बँकेचे व्यवस्थापक राम तांदळे आणि शहर पथविक्रेता संघाचे अध्यक्ष संजय पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.
मेळाव्यात पंजाब नॅशनल बँकेचे व्यवस्थापक राम तांदळे यांनी प्रधानमंत्री स्वनिधी योजना तसेच मुद्रा योजनेची सविस्तर माहिती देत कर्जप्रक्रिया, व्यवसायवृद्धीच्या संधी आणि आर्थिक शिस्तीबाबत मार्गदर्शन केले.
महिला व बालकल्याण समिती सभापती मोनिका घोरपडे आणि नियोजन सभापती अशोक शेडगे यांनी पथविक्रेत्यांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर व्हावे, असे आवाहन केले. नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनोद जळक आणि उपाध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
यावेळी स्वनिधी योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील ५० हजार रुपयांचे कर्ज पूर्णपणे परतफेड करणाऱ्या पाच लाभार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यवस्थापक गीतांजली यादव, सूत्रसंचालन कीर्ती साळुंखे, तर आभार प्रदर्शन आरती जोशी यांनी केले. सेजल साळुंखे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहकार्य केले.
मेळाव्यास जिल्हा समन्वयक राजेंद्र दिवेकर, पाचगणी नगर परिषदेच्या माधवी जगदाळे, महाबळेश्वर नगर परिषदेचे संतोष धड, मलकापूर नगर परिषदेच्या शाहीन मनेर, म्हसवड नगर परिषदेच्या अनिता करंडे यांच्यासह राजधानी सातारा शहर संघाच्या अध्यक्षा आशा मुळीक, सचिव सुवर्णा कडकोळ तसेच विविध वस्तीस्तर संघांच्या सीआरपी व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सोनचिरैया केंद्राच्या व्यवस्थापक अश्विनी निकम यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!