दोन वर्षांपासून पॅरोलवर फरार असलेला खुनातील दोषी अखेर जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

दोन वर्षांपासून पॅरोलवर 

फरार असलेला खुनातील 

दोषी अखेर जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

संतोष शिराळे, सातारा |

कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातून पॅरोल रजेवर जाऊन तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ फरार असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील दोषीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर अटक केली. शाहूपुरी चौकातून आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव भरत कांतीलाल ओसवाल (रा. गुलमोहर कॉलनी, शाहूपुरी, सातारा) असे आहे. तो शाहूपुरी पोलीस ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्यात (भादंवि कलम 302, 498-अ) शिक्षा भोगत होता. 14 मे 2020 रोजी तो 45 दिवसांच्या पॅरोल रजेवर बाहेर आला होता. कोविड-19 परिस्थितीचा लाभ घेत त्याने टप्प्याटप्प्याने रजा वाढवून घेतली. मात्र, 19 मे 2022 रोजी कारागृहात हजर होणे बंधनकारक असतानाही तो परतला नाही. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 172 व 224 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. आरोपी वारंवार ठिकाण बदलत असल्याने तसेच वेशांतर करून राहत असल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. तपास पथकाने आरोपीच्या जुन्या संपर्कांचे विश्लेषण करत नातेवाईक व मित्रांकडून मिळणाऱ्या गुप्त माहितीच्या आधारे त्याचा माग काढला. अखेर 1 जुलै 2026 रोजी भरत ओसवाल शाहूपुरी चौक परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

या कारवाईत पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्यासह पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, प्रविण फडतरे, अविनाश चव्हाण, सुजित भोसले, पृथ्वी जाधव, रोहित निकम आणि महेश निर्मळ यांनी सहभाग घेतला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी कारवाईत सहभागी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments