सातारा जिल्ह्यात मान्सूनचा जोर; कायम पावसामुळे धरण पाणी साठ्यात वाढ, धबधबे ओसंडून वाहू लागले, पर्यटनाला बहर

सातारा जिल्ह्यात

मान्सूनचा जोर कायम

पावसामुळे धरण पाणी साठ्यात वाढ

धबधबे ओसंडून वाहू लागले, पर्यटनाला बहर

संतोष शिराळे, सातारा | सातारा जिल्ह्यात मान्सूनने पुन्हा दमदार हजेरी लावली असून जिल्ह्याच्या पश्चिम घाट परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. महाबळेश्वर, नवजा, कोयना, जावळी आणि पाटण तालुक्यात जोरदार पावसामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक वाढत असून धबधबे दिमाखात कोसळत आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्हा हिरवाईने नटला असून पर्यटकांचा ओढा वाढू लागला आहे.

सातारा शहरात गेल्या २४ तासांत 8.2 मिमी पावसाची नोंद झाली. किमान तापमान 21.4 अंश सेल्सिअस, तर हवेतील आर्द्रता 84 टक्के होती. महाबळेश्वरमध्ये सकाळी दाट धुके पसरले होते. तेथे किमान तापमान 16.6 अंश सेल्सिअस, आर्द्रता 100 टक्के आणि गेल्या २४ तासांत 98 मिमी पाऊस झाला.

महाबळेश्वर, नवजा आणि कोयना परिसरात जोरदार पाऊस

महाबळेश्वर : 84 मिमी (हंगामी 411 मिमी)

नवजा : 103 मिमी (हंगामी 482 मिमी)

कोयना : 55 मिमी (हंगामी 316 मिमी)

कोयना धरणासह जिल्ह्यातील धरणांमध्ये वाढती आवक

आज (१ जुलै) सकाळी कोयना धरणाची पातळी 2042 फूट (622.402 मी.) झाली असून धरणात 14.87 टीएमसी (14.13%) एकूण आणि 9.75 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. धरणात 4,482 क्युसेक पाण्याची आवक सुरू असून सध्या कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही.

जिल्हा पूर नियंत्रण कक्षाच्या अहवालानुसार प्रमुख धरणांमधील स्थिती पुढीलप्रमाणे : 

धोम धरण – 3.81 टीएमसी (28.22%)

उरमोडी धरण – 3.14 टीएमसी (31.53%)

कण्हेर धरण – 3.46 टीएमसी (34.26%)

तारळी धरण – 0.63 टीएमसी (10.77%)

वेण्णा, मोरणा, उरमोडी, नेर, येरळवाडी, हातगेघर, वांग आदी मध्यम प्रकल्पांमध्येही पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे.

जिल्ह्यातील 14 प्रमुख व मध्यम धरणांमध्ये एकूण 30.20 टीएमसी पाणीसाठा असून त्यापैकी 21.68 टीएमसी उपयुक्त साठा (14.56%) उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा उपयुक्त साठा 77.08 टीएमसी होता.

धबधबे पर्यटकांना खुणावत आहेत

सततच्या पावसामुळे ओझर्डे धबधबा फेसाळत कोसळत असून हजारो पर्यटकांना आकर्षित करत आहे. ठोसेघर धबधबा, ओझराई धबधबा आणि पाथरपुंज परिसरातील असंख्य नैसर्गिक धबधबे व धुक्याने वेढलेले डोंगर पर्यटकांना मोहिनी घालत आहेत. मात्र, वेगवान प्रवाहाजवळ जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाबळेश्वर–पाचगणीला पर्यटनाचा बहर

महाबळेश्वर आणि पाचगणी येथे धुक्याची दुलई, हिरव्यागार दऱ्या, निसर्गरम्य पॉइंट्स, वेण्णा लेक परिसर आणि आल्हाददायक वातावरणामुळे पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. सप्ताहअखेरीस या दोन्ही पर्यटनस्थळांवर मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सातारा जिल्ह्यात पुढील काही दिवस मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कायम असून धरणांतील पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत.

Post a Comment

0 Comments