एससी उपवर्गीकरणाविरोधात मुंबईत ५८ जातींचा महामोर्चा; पश्चिम महाराष्ट्र रिपब्लिकन सेना अध्यक्ष रमेश अनिल उबाळे यांच्यासह कार्यकर्त्यांचा सहभाग

मुंबई : दादर येथील एससी उपवर्गीकरण महामोर्चात रिपब्लिकन सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमेश उबाळे यांचा सहभाग. समवेत भीमसैनिक. (छाया : निनाद जगताप)

एससी उपवर्गीकरणाविरोधात

मुंबईत ५८ जातींचा महामोर्चा

पश्चिम महाराष्ट्र रिपब्लिकन सेना अध्यक्ष रमेश अनिल उबाळे यांच्यासह कार्यकर्त्यांचा सहभाग

मुंबई | प्रतिनिधी

अनुसूचित जाती (एससी) उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर विविध सामाजिक संघटना आणि रिपब्लिकन गटांच्या वतीने सोमवारी मुंबईत भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी आणि ५८ जातींच्या प्रतिनिधींनी या मोर्चात सहभाग घेतला. भर पावसातही मोठ्या संख्येने उपस्थिती राहिल्याने मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

मोर्चादरम्यान आंदोलकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या समता व सामाजिक न्यायाच्या विचारांचा उल्लेख करत आरक्षण व्यवस्थेत कोणतीही फूट पडू नये, अशी भूमिका मांडली. आंदोलकांनी घोषणाबाजी आणि फलकांच्या माध्यमातून आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काही आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या विषयावरील भूमिका मांडल्याची माहिती मोर्चाच्या आयोजकांनी दिली. तसेच सभागृहात या विषयावर प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

महामोर्चात रिपब्लिकन सेनानी आनंदराज आंबेडकर, राजकुमार बडोले, अमन आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, जयदीप कवाडे, बबनराव घोलप, माजी आमदार बाबुराव माने, भीमराव केंगार यांच्यासह विविध रिपब्लिकन गटांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि हजारो भीमसैनिक सहभागी झाले होते.

पश्चिम महाराष्ट्रातून रिपब्लिकन सेना अध्यक्ष रमेश अनिल उबाळे, नितीन रोकडे, आनंदा कांबळे, विशाल वायदंडे, शाहरुख शेख, भीमराव धुळप, गणपत कारंडे, शिरीष मोरे, संजय कांबळे, अजित जगताप, वसंत ननावरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले होते.

मोर्चासाठी राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या नाश्ता व चहापाण्याची व्यवस्था दादर येथील डॉ. आंबेडकर भवन येथे करण्यात आली होती. विविध जाती-धर्मातील सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वयंसेवक म्हणून सहभाग घेत मोर्चाच्या आयोजनात सहकार्य केले.

मोर्चादरम्यान मुंबई पोलिसांनी केलेल्या नियोजनामुळे संपूर्ण आंदोलन शांततेत आणि सुरळीत पार पडल्याबद्दल आयोजकांनी पोलिस प्रशासनाचे आभार मानले. तसेच विविध प्रसारमाध्यमांनी महामोर्चाचे थेट प्रक्षेपण व वृत्तांकन केल्याबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

या महामोर्चामुळे मुंबईतील वाहतूक, खानपान आणि इतर व्यावसायिक व्यवहारांनाही काही प्रमाणात चालना मिळाल्याची चर्चा मोर्चाच्या परिसरात होती. मात्र, त्याबाबत अधिकृत आर्थिक आकडेवारी उपलब्ध झालेली नाही.

Post a Comment

0 Comments