56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटींची कर्जमाफी : मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले; 48 हजार कोटींची वीजबिल थकबाकीही माफ

राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना

36,585 कोटींची कर्जमाफी

: मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

48 हजार कोटींची वीजबिल थकबाकीही माफ

सातारा | प्रतिनिधी

महायुती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देणारे ऐतिहासिक निर्णय घेतले असून, 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' अंतर्गत राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना तब्बल 36 हजार 585 कोटींच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तसेच साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांची 48 हजार कोटींची जुनी वीजबिल थकबाकी माफ करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली. सातारा येथील सर्किट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्यात येणार असून, यापूर्वीच्या काही अटीही शिथिल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अधिकाधिक पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय, कृषीपंपधारक शेतकऱ्यांची साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या पंपांची 48 हजार कोटींची जुनी वीजबिल थकबाकीही माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यातील शेती अधिक सक्षम, आधुनिक आणि शाश्वत करण्यासाठी सरकार दरवर्षी सुमारे ₹95 हजार कोटींची तरतूद करत असल्याचे सांगताना त्यांनी जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, सौरपंप, सौर कृषीवाहिनी, ठिबक सिंचन आणि नदीजोड प्रकल्प यांसारख्या योजनांमुळे शेतीचे अर्थकारण मजबूत करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील असल्याचे नमूद केले.

राज्य सरकारच्या या निर्णयांमुळे शेती उत्पादन वाढण्यास, सिंचन सुविधांमध्ये सुधारणा होण्यास आणि शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वासही मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments