जावली पंचायत समितीचे उपसभापती गोरख महाडिक यांच्यासह तिघांना न्यायालयीन कोठडी; २०१३च्या फसवणूक प्रकरणात मेढा न्यायालयाची कारवाई

जावली पंचायत समितीचे

उपसभापती गोरख महाडिक

यांच्यासह तिघांना 

न्यायालयीन कोठडी

२०१३च्या फसवणूक प्रकरणात मेढा न्यायालयाची कारवाई

मेढा | प्रतिनिधी

जावली पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती तथा भाजपचे पदाधिकारी गोरख महाडिक यांच्यासह सचिन बेलोशे आणि संदीप क्षीरसागर यांना फसवणुकीच्या प्रकरणातील न्यायालयीन सुनावणीस वारंवार गैरहजर राहिल्याने मेढा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने अटक वॉरंट बजावले होते. या वॉरंटच्या अनुषंगाने तिघेही सोमवारी न्यायालयात हजर झाले असता न्यायालयाने त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक करून न्यायालयीन कोठडीसाठी जिल्हा कारागृहात रवाना केले.

मिळालेल्या माहितीनुसार, सन २०१३ मध्ये जमिनीसंदर्भातील कथित बनावट दस्तऐवज तयार करून त्याच्या आधारे फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात गोरख महाडिक, विकास देशमुख, संदीप क्षीरसागर, सचिन बेलोशे यांच्यासह एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले असून खटल्याची सुनावणी सुरू आहे.

मात्र, सुनावणीदरम्यान संबंधित आरोपी वारंवार गैरहजर राहत असल्याने मेढा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले होते. या पार्श्वभूमीवर गोरख महाडिक, संदीप क्षीरसागर आणि सचिन बेलोशे हे अटक वॉरंट रद्द करण्यासाठी न्यायालयात हजर झाले. मात्र, न्यायालयाने त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक करून जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत दाखल केले.

गोरख महाडिक हे सध्या जावली पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती असून भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. विद्यमान लोकप्रतिनिधीला न्यायालयीन कोठडी झाल्याने जावली तालुक्यात या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Post a Comment

0 Comments