दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाची धग साताऱ्यात; 'धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा द्या'च्या घोषणांनी परिसर दणाणला; राजवाडा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत विद्यार्थ्यांचा मूक मोर्चा; NEET पेपरफुटीप्रकरणी निषेध, लाठीचार्जवरही संताप

दिल्लीतील विद्यार्थी 

आंदोलनाची धग साताऱ्यात

'धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा द्या'च्या घोषणांनी परिसर दणाणला

राजवाडा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत विद्यार्थ्यांचा मूक मोर्चा

NEET पेपरफुटीप्रकरणी निषेध, लाठीचार्जवरही संताप

सातारा | प्रतिनिधी

दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ साताऱ्यात विद्यार्थ्यांनी शुक्रवारी एकत्र येत शक्तिप्रदर्शन केले. नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, तसेच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस कारवाईचा निषेध करत विद्यार्थ्यांनी राजवाडा ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत मूक मोर्चा काढला.

सातारा शहरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा न घेता या आंदोलनात सहभागी झाले होते. गांधी मैदान, राजवाडा येथून मोर्चाला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून शांततेत मोर्चा काढत निषेध नोंदविला.

मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांच्या हातात "NEET परीक्षेला न्याय द्या", "पेपरफुटीतील दोषींवर कठोर कारवाई करा", "विद्यार्थ्यांवरील दडपशाही थांबवा" अशा आशयाचे फलक होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर विद्यार्थ्यांनी आंदोलनाची सांगता करत दिल्लीतील आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.

आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, नीट पेपरफुटी प्रकरणातील जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देईपर्यंत आंदोलन विविध स्वरूपात सुरू राहील. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचीही त्यांनी मागणी केली.

विद्यार्थ्यांनी आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण आणि संविधानिक मार्गाने पार पाडत परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता, जबाबदारी आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments