धरणग्रस्त कावडीची विकासझेप
‘मुख्यमंत्री समृद्ध ग्राम
पंचायत राज अभियानात’
राज्यस्तरावर दावेदारी मजबूत
विभागीय मूल्यमापन समिती प्रभावित
लोकसहभाग, महिला नेतृत्व, स्वच्छता, जलसंवर्धन आणि ग्रामपंचायतीच्या उपहारगृह उपक्रमाचे विशेष कौतुक
संतोष शिराळे | सातारा
हातगेघर धरणाच्या कुशीत वसलेले आणि धरणग्रस्त म्हणून ओळखले जाणारे जावळी तालुक्यातील कावडी गाव आज विकासाच्या नव्या पर्वाची यशोगाथा लिहित आहे. मुख्यमंत्री समृद्ध ग्राम पंचायत राज अभियानात सातारा जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावल्यानंतर विभागीय मूल्यमापन समितीने बुधवारी गावाची सखोल पाहणी केली. लोकसहभाग, पर्यावरणपूरक विकास, महिला नेतृत्व आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या बळावर कावडीने समितीवर ठसा उमटवला.
समितीचे अध्यक्ष तथा अहिल्यानगरचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक यांनी कावडी ग्रामपंचायतीच्या विकासकामांचे कौतुक करत, "धरणग्रस्त गाव असूनही कावडीने विकासाचा आदर्श निर्माण केला आहे. जावळीसारख्या दुर्गम भागातील ही ग्रामपंचायत राज्यस्तरावर निश्चितच उल्लेखनीय कामगिरी करेल," असा विश्वास व्यक्त केला.
समितीच्या आगमनावेळी गावकऱ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात, पारंपरिक पद्धतीने आणि महिलांच्या उत्स्फूर्त सहभागातून स्वागत केले. त्यानंतर समितीने ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, स्वच्छता व्यवस्था, रेन वॉटर हार्वेस्टिंग, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, जलसंवर्धन, वृक्षारोपण तसेच विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली.
कावडी ग्रामपंचायतीने स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आणि ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी सुरू केलेल्या उपहारगृहाच्या उपक्रमाने समितीचे विशेष लक्ष वेधून घेतले. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उत्पन्ननिर्मितीचा हा अभिनव प्रयोग राज्यातील इतर ग्रामपंचायतींसाठीही प्रेरणादायी ठरू शकतो, असे मत समिती सदस्यांनी व्यक्त केले.
गावातील विकासामागे महिलांचा सक्रिय सहभाग, ग्रामस्थांची एकजूट आणि लोकसहभाग हेच यशाचे सूत्र असल्याचे जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे यांनी सांगितले. "प्रत्येक ग्रामस्थाने गावाच्या विकासाला स्वतःचे काम मानले. त्यामुळेच आज कावडी विभागीय स्तरापर्यंत पोहोचली असून राज्यस्तरावरही गावाचे नाव उज्ज्वल होईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डोंगररांगांच्या सान्निध्यात आणि हातगेघर धरणाच्या जलाशयामुळे लाभलेल्या नैसर्गिक संपदेचा योग्य वापर करत कावडीने स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, पाणी व्यवस्थापन आणि ग्रामविकासाचा सुंदर समतोल साधला आहे. शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, महिला बचतगटांचे योगदान आणि लोकसहभागातून उभारलेली विकासकामे ही कावडीच्या यशामागील प्रमुख कारणे असल्याचे समितीने निरीक्षण नोंदवले.
यावेळी समिती सदस्य रामप्रसाद लाहोटी, राजन पाटील, दादासाहेब गुंजाळ, पी. एस. म्हस्के, रवींद्र महाजन, राहुल देसाई, माजी आमदार सदाशिव सपकाळ, जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे, उपसभापती गोरख महाडिक, गटविकास अधिकारी निलेश पाटील, सरपंच यशवंत मानकुमरे, ग्रामविकास अधिकारी मंगेश शिंदे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!