सातारा पोलिसांकडून
64 लाखांच्या
अंमली पदार्थांचा नाश
509 किलो गांजा, गांजाची व अफूची झाडे भट्टीत जाळून नष्ट
17 गुन्ह्यांतील जप्त मुद्देमालाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण
अंमली पदार्थ नाश समितीची मोठी कारवाई
सातारा | प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने जिल्हा अंमली पदार्थ नाश समितीने तब्बल 64 लाख 13 हजार 147 रुपये किमतीचा आणि 509 किलो वजनाचा गांजा, गांजाची झाडे तसेच अफूची झाडे यांचा कायदेशीर प्रक्रियेनंतर नाश केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या समन्वयाने करण्यात आली.
पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या अंमली पदार्थ नाश समितीने सातारा जिल्ह्यातील 14 पोलीस ठाण्यांमध्ये दाखल 17 गुन्ह्यांतील जप्त अंमली पदार्थांचा नाश केला. संबंधित गुन्ह्यांमध्ये इन्व्हेंटरी पंचनामे, रासायनिक विश्लेषण (सी.ए.) प्रमाणपत्र आणि न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच ही कारवाई करण्यात आली.
सदर अंमली पदार्थांचा नाश कराड हॉस्पिटल असोसिएशनच्या जैववैद्यकीय कचरा निर्मूलन प्रकल्पातील विशेष भट्टीमध्ये करण्यात आला. यावेळी न्याय सहायक प्रयोगशाळा, गणेशखिंड (पुणे) येथील रासायनिक विश्लेषक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, वैधमापनशास्त्र विभागाचे निरीक्षक तसेच दोन शासकीय पंच उपस्थित होते.
या कारवाईत पोलीस अधीक्षक तथा अंमली पदार्थ नाश समितीचे अध्यक्ष निखील पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष शिंदे, पोलीस उपअधीक्षक (गृह) कृष्णकुमार जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहायक रासायनिक विश्लेषक श. भा. गटकळ, वैधमापनशास्त्र विभागाच्या अर्चना जगदाळे, निरीक्षक डी. व्ही. तेलंग, जैव कचरा निर्मूलन प्रकल्पाचे व्यवस्थापक राहुल पवार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, साबीर मुल्ला, मुनीर मुल्ला आणि इरफान मुलाणी यांनी सहभाग घेतला.
सातारा पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक कठोर करत जप्त केलेल्या अंमली पदार्थांचा नियमानुसार नाश करून अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधातील आपली भूमिका पुन्हा अधोरेखित केली आहे.


0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!