साताऱ्यात महायुतीत 'ऑल इज वेल' की अंतर्गत धुसफूस?; शंभूराज देसाई-मकरंद पाटील गैरहजर


साताऱ्यात महायुतीत

 'ऑल इज वेल' की
 
अंतर्गत धुसफूस?

शंभूराज देसाई-मकरंद पाटील गैरहजर

अभयसिंह जगतापांचा विजय दृष्टीक्षेपात?

संतोष शिराळे, सातारा : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली असताना महायुतीतील अंतर्गत नाराजी आणि मतभेद उघडपणे समोर येऊ लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. कागदावर महायुतीचे संख्याबळ भक्कम दिसत असले, तरी साताऱ्यातील काही घडामोडींमुळे महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांच्या आशा पल्लवित झाल्याचे बोलले जात आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कराड येथे महत्त्वाची समन्वय बैठक पार पडली. या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. त्याआधी विटा येथे आमदार सुहास बाबर यांच्या निवासस्थानीही महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

मात्र, या दोन्ही बैठकींकडे शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद पाटील यांनी पाठ फिरवल्याची चर्चा रंगली असून, त्यातून महायुतीतील अंतर्गत नाराजी समोर आल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांवर प्रभाव असलेल्या या दोन्ही नेत्यांची अनुपस्थिती अनेक राजकीय प्रश्न निर्माण करत आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी साताऱ्यातील राजकीय समीकरणांमध्ये सक्रिय हस्तक्षेप करत महायुतीतील असंतुष्ट गटांशी संवाद वाढवल्याची चर्चा आहे. त्यांच्या राजकीय हालचालींमुळे भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे बोलले जात असून, शिवेंद्रराजे भोसले यांनी त्याची तुलना "पायात साप सोडण्याशी" केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

२०१६ च्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंगमुळे अनपेक्षित निकाल लागला होता. त्यामुळे यंदाही स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नाराज गट मतदानाच्या दिवशी वेगळा निर्णय घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सातारा जिल्हा परिषदेत महायुतीतील अंतर्गत वादाचे पडसाद उमटत असल्याची चर्चा असून, त्याचा थेट फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. 

वरवर पाहता महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांचे पारडे जड मानले जात असले, तरी साताऱ्यातील अंतर्गत खदखद, नाराज नेत्यांची भूमिका आणि संभाव्य क्रॉस व्होटिंग या घटकांमुळे निवडणूक अत्यंत चुरशीची बनली आहे. त्यामुळे २०१६ प्रमाणे पुन्हा एखादा राजकीय चमत्कार घडणार का, आणि महाविकास आघाडीचे अभयसिंह जगताप विजयाचा गुलाल उधळणार का, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. महायुतीचे संख्याबळ की महाविकास आघाडीची राजकीय खेळी? अंतर्गत नाराजीचा उद्रेक की शेवटच्या क्षणी एकजूट? याचे उत्तर आता मतपेटीतूनच मिळणार आहे.

Post a Comment

0 Comments