सातारा जिल्हा बँक निवडणूक; विकास सोसायटीच्या 'ठराव'वरून मोठा राडा! आनेवाडीत वाद पोलिस ठाण्यात; मेढा सेंटरमध्ये शशिकांत शिंदेंना धक्का; तर पाटणात मतदार अज्ञातस्थळी !


सातारा जिल्हा बँक निवडणूक

विकास सोसायटीच्या

'ठराव'वरून मोठा राडा !

आनेवाडीत वाद पोलिस ठाण्यात


मेढा सेंटरमध्ये शशिकांत शिंदेंना धक्का


तर पाटणात मतदार अज्ञातस्थळी !


संतोष शिराळे | सातारा


सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Satara DCC Bank) आगामी संचालक मंडळ निवडणुकीची रणधुमाळी जसजशी जवळ येत आहे, तसतसे जिल्ह्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. ५ ऑगस्टपर्यंत सहकारी संस्थांचे मतदार ठराव जमा करण्याची मुदत असल्याने ग्रामीण सहकार क्षेत्रात अक्षरशः 'साम-दाम-दंड-भेद'चा वापर सुरू झाला आहे. पाटण तालुक्यात ठराव झालेले मतदार अज्ञातस्थळी हलवण्यात आल्याची चर्चा गरम असतानाच, जावळी तालुक्यातील 'मेढा सेंटर' सोसायटीत शशिकांत शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. त्यातच आता आनेवाडी सोसायटीतील वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.


जावळी तालुक्यातील अत्यंत महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या आनेवाडी विकास सेवा सोसायटीच्या सभेत जिल्हा बँकेच्या मतदार ठरावावरून संचालकांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक झाली. गेल्या अनेक वर्षांपासून एकाच पद्धतीने ठराव होत असल्याचा आरोप करत काही सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. या वादानंतर चेअरमनच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करण्यात आली.


सभेतील गदारोळानंतर काही सदस्यांना कथितपणे अज्ञातस्थळी हलवल्याच्या (अपहरणाच्या) चर्चांनी जोर धरला आहे. वाद विकोपाला गेल्यानंतर ही माहिती पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली असून, काही नाराज सदस्य आता न्यायालयीन मार्ग स्वीकारण्याच्या तयारीत आहेत.


दुसरीकडे जावळी तालुक्यातीलच १२ गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या मेढा सेंटर विकास सेवा सोसायटीच्या ठरावावरून मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यात जोरदार प्रतिष्ठा पणाला लागली होती. या बैठकीत विरोधी सचिन जवळ (सूचक : आनंदराव सुतार, अनुमोदन : गणपत गोरे) यांच्या पराभव करत, शिवेंद्रराजे गटाच्या डॉ. रामदास वांगडे (सूचक : सुरेश दळवी, अनुमोदन : पुंडलिक पार्टे) यांच्या नावाचा ठराव ८ विरुद्ध ५ मतांनी मंजूर करण्यात आला.


मेढा सेंटर सोसायटी गेल्या अनेक वर्षांपासून शशिकांत शिंदे यांच्या ताब्यात होती. मात्र, शिवेंद्रराजे गटाने गेल्या तीन वर्षांत मुत्सद्दी रणनीती आखत शिंदे गटाच्या संचालकांना आपल्या बाजूने वळवले. हक्काची सोसायटी हातातून गेल्याने शशिकांत शिंदे यांच्या जिल्हा बँकेतील पुनरागमनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


पाटण तालुक्यात पालकमंत्री शंभूराज देसाई आणि भाजप नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्यातील राजकीय ईर्ष्या टोकाला पोहोचली आहे. मागील निवडणुकीत अवघ्या १४ मतांनी पराभूत झालेल्या मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी बँक प्रवेश निश्चित करण्यासाठी आक्रमक मोर्चेबांधणी केली आहे.ऐनवेळी मते फुटू नयेत किंवा दगाफटका होऊ नये म्हणून सोसायटी मतदारसंघातून ठराव झालेले मतदार दोन्ही गटांकडून अज्ञातस्थळी हलवण्यात आल्याची चर्चा आहे.


पाटणमधील १०५ एकूण मतदारांपैकी ५२ मते मिळवणारा बाजी मारणार असल्याने, दोन्ही गटांचे कार्यकर्ते सहाय्यक निबंधक कार्यालयात रात्रंदिवस ठाण मांडून बसले आहेत. देसाई यांच्याविरोधात पाटणकर गटातून विद्यमान संचालक सत्यजितसिंह पाटणकर उतरणार की त्यांचे बंधू याज्ञसेन पाटणकर, यावर अद्याप सस्पेन्स कायम आहे.


एकीकडे महायुती सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई (शिवसेना), शिवेंद्रसिंहराजे भोसले (भाजप) आणि सत्यजितसिंह पाटणकर (भाजप) आमनेसामने ठाकले आहेत, तर दुसरीकडे खासदार उदयनराजे भोसले, खासदार नितीन पाटील आणि मंत्री मकरंद पाटील यांसारख्या दिग्गज नेत्यांची या अंतर्गत राजकीय संघर्षावर काय भूमिका राहते, याकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे बारीक लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments