शशिकांत शिंदेंच्या होमपीचवर
मंत्री शिवेंद्रराजेंची बाजी
आखाडे विकास सोसायटीचा ठराव ६-५ मतांनी शिवेंद्रराजेंच्या बाजूने
जिल्हा बँक निवडणुकीपूर्वी जावळीत मोठी राजकीय घडामोड
मेढा | प्रतिनिधी
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जावळी तालुक्यातील विकास सोसायट्यांच्या ठरावांकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. त्यात माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे राजकीय बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या आखाडे विकास सोसायटीच्या ठरावाने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली. अखेर अत्यंत चुरशीच्या लढतीत हा ठराव बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थकांच्या बाजूने झाला.
आखाडे हे शशिकांत शिंदे यांचे प्रभावक्षेत्र मानले जाते. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदे गटाला या गावातून मोठे मताधिक्य मिळाल्याने विकास सोसायटीचाही ठराव त्यांच्या बाजूने होईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र प्रत्यक्ष मतदानात वेगळेच चित्र पाहायला मिळाले.
ठरावासाठी गुरुवारी विकास सोसायटीच्या संचालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यापूर्वी दोन्ही गटांनी संचालकांची जुळवाजुळव करण्यासाठी मोठी रणनीती आखल्याची चर्चा होती. बैठकीसाठी दोन्ही गटांचे सर्व संचालक उपस्थित राहिले.
ठरावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंचे प्रमुख नेते आखाडे गावात दाखल झाले होते. बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे, पंचायत समिती सभापती सौरभ शिंदे आणि बाजार समिती सभापती जयदीप शिंदे यांनी गावात उपस्थिती लावली होती. तर दुसऱ्या बाजूला माजी आमदार शशिकांत शिंदे यांचे सुपुत्र तेजस शिंदे, माजी सभापती मोहनराव शिंदे, बाजार समिती संचालक बुवासाहेब पिसाळ यांच्यासह समर्थकांनी मोर्चेबांधणी केली होती. त्यामुळे गावात दिवसभर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.
अखेर झालेल्या मतदानात शिवेंद्रराजे भोसले गटाच्या उमेदवार उषा सुरेशराव शिंदे यांना ६ मते, तर शिंदे गटाचे उमेदवार व विद्यमान चेअरमन राजेंद्र शिंदे यांना ५ मते मिळाली. त्यामुळे एका मताच्या फरकाने आखाडे विकास सोसायटीचा ठराव शिवेंद्रराजे भोसले यांच्या बाजूने गेला.
या निकालामुळे जावळी तालुक्यातील राजकीय समीकरणांवर नव्याने चर्चा सुरू झाली असून, आगामी जिल्हा बँक निवडणुकीच्या दृष्टीने या ठरावाकडे महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून पाहिले जात आहे.
दरम्यान, ठरावावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, सहाय्यक फौजदार गंगावणे यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आखाडे विकास सोसायटीचा ठराव शिवेंद्रराजे भोसले गटाच्या बाजूने.
उषा सुरेशराव शिंदे यांना ६, तर राजेंद्र शिंदे यांना ५ मते.
शशिकांत शिंदे यांचे प्रभावक्षेत्र मानल्या जाणाऱ्या गावात निकालामुळे राजकीय चर्चा.
जिल्हा बँक निवडणुकीपूर्वी जावळीतील राजकीय समीकरणांना नवी कलाटणी.
ठरावावेळी कडक पोलीस बंदोबस्त.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!