शेतकऱ्यांच्या गोठ्यांतील जनावरे चोरणारी 'पिकअप गँग' जेरबंद ; सराईत टोळीचा भुईंज पोलिसांनी पर्दाफाश

शेतकऱ्यांच्या गोठ्यांतील जनावरे

चोरणारी 'पिकअप गँग' जेरबंद

सराईत टोळीचा भुईंज पोलिसांनी पर्दाफाश

सातारा | प्रतिनिधी

भुईंज, कुडाळ, बावधन आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या गोठ्यांमधून जनावरे चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा भुईंज पोलिसांनी पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली पिकअप गाडी जप्त करण्यात आली असून, चोरीला गेलेली जनावरे परत मिळविण्यासाठी पोलिसांनी तपासाची मोहीम वेगाने सुरू केली आहे.

भुईंज पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यानुसार, १९ जून २०२६ रोजी रात्री ८ ते २० जून रोजी सकाळी ८ या कालावधीत मौजे कवठे (ता. वाई) येथील शेतकरी किरण नानासो पोळ यांच्या गोठ्यातून दोन मुर्रा जातीच्या म्हशी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या. या प्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१५/२०२६ अन्वये बीएनएस कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

शेतकऱ्यांच्या उपजीविकेशी संबंधित हा गंभीर गुन्हा लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली.

तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. आरोपी पिकअप वाहनातून पाचवडच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पाचवड चौकात सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. सुरेश ऊर्फ सूर्यकांत आनंदराव चव्हाण (वय ३५, रा. पाचवड, ता. वाई), संदेश हणमंत पिसाळ (वय २७, रा. व्याजवाडी, ता. वाई), हर्षद हिंदुराव चव्हाण (वय १८, रा. कडेगाव, ता. वाई) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत

सखोल चौकशीत आरोपींनी कवठे येथून दोन म्हशी, ओझर्डे येथून एक म्हैस, खडकी येथून एक जर्सी गाय आणि कुडाळ येथून दोन म्हशी चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेली जनावरे त्यांनी चाकण (पुणे), काष्टी-श्रीगोंदा (अहिल्यानगर) आणि सांगोला (सोलापूर) येथील गुरांच्या बाजारात विकल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी आरोपींना अटक करून न्यायालयाच्या आदेशानंतर पोलीस कोठडीत घेतले असून, चोरीस गेलेली जनावरे ज्या व्यापाऱ्यांना विकण्यात आली त्यांचा शोध सुरू आहे. जनावरे जप्त करून ती मूळ मालकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बेंदूर सणाच्या दिवशी झालेल्या या कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांनी भुईंज पोलिसांचे कौतुक करत समाधान व्यक्त केले आहे.

ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंदे, पोलीस हवालदार नितीन जाधव, धायगुडे, तसेच पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते आणि किरण निंबाळकर यांच्या पथकाने केली.

Post a Comment

0 Comments