विश्वजीत कदम, विशाल पाटील
यांची अभयसिंह जगताप यांच्या
विजयासाठी जोरदार फिल्डिंग
कडेगावमध्ये काँग्रेसचा शक्तिप्रदर्शन मेळावा
स्वाभिमान आणि गुप्त मतदानाचा मुद्दा केंद्रस्थानी
संतोष शिराळे, सातारा : सांगली–सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक २०२६ मध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभयसिंह जगताप यांच्या प्रचाराला गती मिळत असून काँग्रेस पक्षानेही विजयासाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. कडेगाव येथील सागरेश्वर सहकारी सूतगिरणी लिमिटेड येथे झालेल्या सांगली जिल्हा काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण संवाद मेळाव्यात पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीचा निर्धार व्यक्त केला.
या मेळाव्यास माजी मंत्री तथा आमदार विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील, आमदार विक्रम सावंत, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष ऋषिकेश लाड, पंचायत समिती सभापती जितेश कदम यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि विविध पदाधिकारी उपस्थित होते.
महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांकडून मिळणारा उत्स्फूर्त पाठिंबा हा आगामी विजयाचा मजबूत पाया असल्याचा विश्वास अभयसिंह जगताप यांनी व्यक्त केला. सातारा आणि सांगली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा आवाज विधान परिषदेत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी सर्वजण एकदिलाने काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याच पार्श्वभूमीवर अभयसिंह जगताप यांनी मंत्री तथा आमदार विश्वजीत कदम यांची सदिच्छा भेट घेत आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा केली. लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बळावर ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांतील मतदारांना आवाहन करताना म्हणाले, ही निवडणूक केवळ पक्षीय राजकारणाची नसून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्वाभिमानाची आणि लोकप्रतिनिधींच्या अधिकारांची असल्याचे नमूद केले. मतदान प्रक्रिया पूर्णपणे गुप्त असल्याने कोणत्याही दबावाला बळी न पडता विवेकबुद्धीने मतदान करावे. अभ्यासू, संयमी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांची सखोल जाण असलेले नेतृत्व म्हणून अभयसिंह जगताप यांच्याकडे पाहिले जात असल्याचे सांगत, बॅलेट पेपरवरील क्रमांक एकच्या चौकोनात '१' हा अंक लिहून त्यांना विजयी करावे.
कडेगावमधील काँग्रेसच्या शक्तिप्रदर्शनामुळे आणि विश्वजीत कदम, विशाल पाटील यांच्यासह स्थानिक नेतृत्वाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे महाविकास आघाडीने सांगली जिल्ह्यातील प्रचारात स्पष्ट आघाडी घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!