महायुतीत धुसफूस, भाजपचे ‘ऑपरेशन लॉक’

सांगली–सातारा विधान परिषद निवडणूक 

महायुतीत धुसफूस, 

भाजपचे ‘ऑपरेशन लॉक’...!

मतदार थेट टूरवर, क्रॉस व्होटिंगची धास्ती वाढली?

संतोष शिराळे, सातारा : सांगली–सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत धुसफूस आणि वाढत्या क्रॉस व्होटिंगच्या भीतीमुळे भाजपला अखेर ‘ऑपरेशन लॉक’ राबवावे लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम यांच्या विजयासाठी पक्षाने आपल्या मतदारांना थेट टूरवर रवाना केल्याने निवडणुकीतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

महायुतीतील नाराजी, स्थानिक पातळीवरील मतभेद, काही मित्रपक्षांच्या नेत्यांची प्रचारापासून असलेली अलिप्तता आणि महाविकास आघाडीने उभे केलेले आव्हान यामुळे भाजप नेतृत्व सतर्क झाले आहे. त्यामुळे सातारा आणि सांगलीतील नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्य आणि इतर मतदारांना एकत्र ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यांना कोकण आणि गोवा परिसरातील ठिकाणी हलविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार, मतदानापूर्वी कोणताही दगाफटका होऊ नये, मतदारांवर विरोधकांचा प्रभाव पडू नये आणि संभाव्य क्रॉस व्होटिंग रोखता यावे, यासाठीच ही खबरदारी घेण्यात आली आहे. काही नगरसेविकांच्या पतींनाही या दौऱ्यात सहभागी करण्यात आल्याची चर्चा असून, नाराजांची मनधरणी करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांकडून स्वतंत्र बैठका घेतल्या जाणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नाराजीनंतर महायुतीत निर्माण झालेल्या तणावावर राज्यातील वरिष्ठ नेतृत्वाने पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुती एकसंघ असल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात मतदारांना ‘सुरक्षित’ स्थळी हलविण्याची वेळ आल्याने महायुतीतील सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा रंगू लागली आहे.

दुसरीकडे, महाविकास आघाडीनेही आपली रणनीती अधिक आक्रमक केली असून, शेवटच्या टप्प्यातील राजकीय हालचालींमुळे निवडणुकीत मोठा उलटफेर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता मतदानाच्या दिवशी नेमके कोणाचे गणित जुळते आणि कोणाला धक्का बसतो, याकडे सातारा आणि सांगली जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments