महायुतीचा धर्म पाळणार...! शंभूराजेंनी फुंकला विजयाचा बिगुल

महायुतीचा धर्म पाळणार...!

शंभूराजेंनी फुंकला विजयाचा बिगुल

धैर्यशील कदमांच्या विजयावर शिक्कामोर्तब?

एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर बदलले सूर

शिवसेनेची संपूर्ण ताकद भाजप उमेदवारामागे

संतोष शिराळे, सातारा : सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या महायुतीतील अंतर्गत मतभेदांवर अखेर पडदा पडल्याचे चित्र दिसत आहे. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या स्पष्ट आदेशानंतर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी महायुती धर्म पाळण्याची भूमिका जाहीर करत भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्या विजयाची जणू घोषणाच केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

गेल्या काही दिवसांत शंभूराज देसाई यांच्या भूमिकेबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. स्थानिक पातळीवरील नाराजी, शिवसेनेतील अस्वस्थता आणि महायुतीतील समन्वयाचा अभाव यामुळे शिवसेना नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. मात्र, साताऱ्यातील बैठकीनंतर मुंबईत सादर झालेल्या अहवालावर स्वतः एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप करत "शिवसेनेचे एकही मत फुटता कामा नये," असा स्पष्ट संदेश दिल्याची माहिती आहे.

या आदेशानंतर शंभूराज देसाई यांनी कोयना दौलत येथे धैर्यशील कदम यांनी भेट घेतली. या भेटीत महायुतीच्या विजयासाठी शिवसेना पूर्ण ताकदीने मैदानात उतरल्याचे जाहीर केले. यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख शरद कणसे उपस्थित होते. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांचे संख्याबळ आधीच महायुतीच्या बाजूने मानले जात असताना आता शिवसेनेच्या मतांवरही शिक्कामोर्तब झाल्याने धैर्यशील कदम यांचे पारडे आणखी जड झाल्याचे बोलले जात आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, शंभूराज देसाई यांनी केवळ महायुती धर्म पाळण्याची भूमिका घेतलेली नाही, तर अपेक्षेपेक्षा जास्त मताधिक्याने धैर्यशील कदम यांना विजयी करण्याची रणनीती स्वीकारल्याचे संकेत त्यांच्या अलीकडील हालचालींमधून मिळत आहेत. त्यामुळे महायुतीतील नाराजी आणि बंडखोरीच्या चर्चांना मोठा धक्का बसला असून विरोधकांसाठी ही चिंतेची बाब ठरू शकते.

दरम्यान, "आलेल्या परिस्थितीला भाजपला सामोरे जावे लागेल," या वक्तव्यामुळे चर्चेत आलेले शंभूराज देसाई आता स्वतः महायुतीच्या विजयाचे प्रमुख शिल्पकार म्हणून पुढे येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीतील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असून धैर्यशील कदम यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. महायुतीतील तिढा संपुष्टात आल्याचे संकेत मिळत असतानाच, आता विरोधकांकडे उरलेले गणित कितपत जुळते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments