युतीधर्मात राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटातून क्रॉस व्होटिंग? जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीचा वचपा काढणार?

युतीधर्मात राष्ट्रवादी (अप) गटातून

सातारा जिल्ह्यात क्रॉस व्होटिंग..?

जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीचा वचपा काढणार..!

संतोष शिराळे, सातारा : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी बुधवारी मतदान पार पडले. मतदानादरम्यान सातारा तहसील कार्यालयात खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची गळाभेट घेत कानात काहीतरी सांगितले. त्यानंतर त्यांनी ठाकरे सेनेचे नरेंद्र पाटील यांच्याशीही कानगोष्टी केल्या. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

विशेष म्हणजे, जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवेळी झालेल्या राजकीय घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी असल्याची चर्चा कायम असतानाच विधान परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींनी आपल्या सदस्यांना एकत्र ठेवत ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला. यावेळी युतीमध्ये वरवर एकजूट दिसत असली तरी अंतर्गत नाराजी अद्याप कायम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील काही नाराज सदस्यांनी सातारा जिल्हा परिषद सत्तासंघर्षाचा वचपा काढण्यासाठी क्रॉस व्होटिंग केले का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. 

महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असली, तरी भाजपमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत क्रॉस व्होटिंगची धास्ती कायम असल्याचे बोलले जात आहे. मतदान संपल्यानंतर आता सर्वांचे लक्ष  22 रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले असून, निकालातूनच नाराजी, मैत्री आणि गुप्त राजकीय समीकरणांचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

Post a Comment

0 Comments