शंभूराज देसाई यांच्या
नाराजीनंतर
महायुतीत पडदा!
फडणवीस-शिंदे-तटकरे बैठकीत सातारा-सांगलीचा तिढा सुटला?
संतोष शिराळे, सातारा : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील नाराजी उघडपणे समोर आल्यानंतर अखेर वरिष्ठ नेतृत्वाला हस्तक्षेप करावा लागल्याचे चित्र आहे. पालकमंत्री तथा शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी "आलेल्या परिस्थितीला भाजपला सामोरे जावे लागणार आहे," असा इशारा दिल्यानंतर महायुतीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले होते. मात्र, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या बैठकीनंतर या वादावर पडदा पडल्याचे संकेत मिळत आहेत.
कराड येथील महायुतीच्या समन्वय बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या शंभूराज देसाई यांनी भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पालकमंत्री म्हणून समन्वय साधण्याचा प्रयत्न करूनही भाजपच्या मंत्र्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत व्यक्त केली होती. "समन्वयासाठी आम्ही पुढाकार घेत असताना तुम्ही येत नाही आणि नंतर स्वबळाची भाषा करता. मग आम्हालाही विचार करावा लागणार ना?" असा सवाल करत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला इशारा दिला होता.
दरम्यान, भाजपने आपल्या नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापतींना एकत्र ठेवण्यासाठी विशेष नियोजन केल्याची चर्चा सुरू असतानाच शिवसेनेनेही कोअर कमिटीच्या बैठका घेत स्वतंत्र भूमिका ठरविण्याची तयारी सुरू केली होती. सदस्यांच्या भावना जाणून घेऊन त्याचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात येणार असल्याचे शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले होते.
या पार्श्वभूमीवर महायुतीतील वाढता तणाव लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात महत्त्वाची बैठक झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. या बैठकीत सातारा-सांगलीतील निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा झाली असून, स्थानिक नेत्यांनी परस्परांतील मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे काम करण्याच्या स्पष्ट सूचना देण्याचा निर्णय वरिष्ठ नेतृत्वाने घेतल्याचे समजते.
महायुतीकडे संख्याबळ असले, तरी स्थानिक पातळीवरील नाराजीमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेने भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्यासमोरील आव्हाने वाढवली होती. त्यातच महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी दोन्ही जिल्ह्यांत आक्रमक प्रचार करत निवडणूक चुरशीची बनविली आहे. त्यामुळे स्थानिक वादांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर वरिष्ठ नेतृत्वाने वेळीच हस्तक्षेप करून महायुतीत एकमत घडवून आणल्याचे बोलले जात आहे.
मात्र, वरिष्ठ पातळीवरील समझोता प्रत्यक्ष मतदानापर्यंत कितपत प्रभावी ठरतो आणि स्थानिक पातळीवरील नाराजी पूर्णपणे निवळते का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!