हुश्श... कदम कदम पे "धैर्य" राखल्याने तिढा सुटला..! सातारा-सांगलीत शिवसेनेचं एकही मत फुटता कामा नये : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शंभूराज देसाईंना निर्देश

हुश्श... कदम कदम पे 

"धैर्य" राखल्याने तिढा सुटला..!

सातारा-सांगलीत शिवसेनेचं एकही मत फुटता कामा नये

महायुती धर्म पाळत भाजपच्या उमेदवाराला विजयी करा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शंभूराज देसाईंना निर्देश

संतोष शिराळे, सातारा : सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून महायुतीत सुरू असलेल्या राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाल्याचे चित्र आहे. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना स्पष्ट शब्दांत महायुती धर्म पाळण्याचे निर्देश देत शिवसेनेचे एकही मत फुटू नये, अशी भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

स्थानिक पातळीवर काही पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा सुरू असतानाच साताऱ्यात शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. या बैठकीत जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेण्यात आल्या. बैठकीतील सविस्तर अहवाल मुंबईत पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर करण्यात आला होता. या अहवालावर चर्चा झाल्यानंतर सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीत महायुतीची एकजूट अबाधित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. "ही जागा महायुतीची आहे. त्यामुळे सर्व घटक पक्षांनी एकत्र राहून भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्या विजयासाठी काम करावे," असा स्पष्ट संदेश शिंदे यांनी दिल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, महसूलमंत्री जयकुमार गोरे यांनी यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि आमदार मकरंद पाटील यांचा पाठिंबा मिळाल्यास ही निवडणूक एकतर्फी होऊ शकते, असा दावा केला होता. त्यात आता शिवसेनेची भूमिका स्पष्ट झाल्यामुळे महायुतीचे संख्याबळ आणखी मजबूत झाल्याचे मानले जात आहे.

विशेष म्हणजे, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या काही वक्तव्यांमुळे महायुतीत नाराजी असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यामुळे शिवसेना नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या स्पष्ट आदेशानंतर सर्व तर्क-वितर्कांना पूर्णविराम मिळाला असून महायुतीतील तिढा सुटल्याची भावना भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. यामुळे सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांचे पारडे अधिक जड झाल्याची चर्चा असून विरोधकांसमोर आता नवे आव्हान उभे राहिल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.



Post a Comment

0 Comments