कोयना धरणातील
एकूण पाणीसाठा
१४.१३ टीएमसीवर
सांगली पाटबंधारे विभागाची मागणी घटल्याने विसर्गात कपात
आगामी काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची अपेक्षा
संतोष शिराळे, सातारा : जिल्ह्यात मान्सूनचे वातावरण कायम असले तरी मंगळवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली. महाबळेश्वर परिसरात सकाळी धुक्याची तर सायंकाळी धूसर वातावरणाची नोंद झाली. दरम्यान, कोयना धरणातील एकूण पाणीसाठा १४.१३ टीएमसी (१३.४३ टक्के) इतका असून उपयुक्त पाणीसाठा ९.०१ टीएमसी (८.९९ टक्के) आहे.
सायंकाळी पाच वाजता धरणाची पाणीपातळी २०३९ फूट ११ इंच (६२१.७६७ मीटर) इतकी नोंदविण्यात आली. कोयना धरण क्षेत्रात मंगळवारी पावसाची नोंद झाली नसली तरी हंगामातील एकूण पर्जन्यमान कोयना येथे १५ मिमी, नवजा येथे ७५ मिमी तर महाबळेश्वर येथे २४ मिमी इतके झाले आहे. धरणात सध्या नव्या पाण्याची आवक नसून आवक शून्य क्युसेक्स इतकी आहे.
सांगली पाटबंधारे विभागाकडून पाण्याची मागणी कमी झाल्यामुळे कोयना धरणातून होणाऱ्या विसर्गात कपात करण्यात आली आहे. सध्या कोयना पायथा विद्युतगृहाचे एकच युनिट दिवसातून केवळ १२ तास सुरू ठेवण्यात येत असून त्याद्वारे कोयना नदीपात्रात सरासरी ५२५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
हवामान विभागाच्या नोंदीनुसार, महाबळेश्वर येथे किमान तापमान १८.५ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान २७.१ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. सकाळी हवेतील आर्द्रता ९३ टक्के असून धुक्याचे वातावरण होते, तर सायंकाळी आर्द्रता ८१ टक्के राहून धूसर वातावरणाची नोंद झाली.
सातारा शहरात किमान तापमान २२.४ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. दिवसभर पावसाची नोंद झाली नसून हंगामातील एकूण पर्जन्यमान १३.३ मिमी इतके झाले आहे. सकाळी हवेतील आर्द्रता ६९ टक्के तर दुपारी ४९ टक्के नोंदविण्यात आली. मान्सूनच्या पुढील सक्रियतेकडे शेतकऱ्यांसह सर्वांचे लक्ष लागले असून आगामी काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!