सातारा-सांगली विधान परिषदेत

भाजपची मजबूत पकड..!

'रिसॉर्ट पॉलिटिक्स'मुळे धैर्यशील कदम यांचे पारडे अधिक जड?

संतोष शिराळे, सातारा : सातारा–सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घडामोडींना वेग आला असून भाजपने विजयासाठी कंबर कसल्याचे चित्र दिसत आहे. भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्या विजयासाठी पक्षाकडून काटेकोर नियोजन करण्यात येत असून मतांमध्ये फूट पडू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.

दरम्यान, शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक साताऱ्यात पार पडली असून बैठकीतील सविस्तर अहवाल शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. "सातारा–सांगली विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची भूमिका ही मुख्य नेते एकनाथ शिंदे ठरवतील आणि त्यांचा आदेशच अंतिम असेल," असेही स्पष्ट करण्यात आले.

दुसरीकडे, मंत्री जयकुमार गोरे यांनी केलेल्या दाव्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि मंत्री मकरंद पाटील यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यास ही निवडणूक एकतर्फी होऊ शकते. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सांगली जिल्ह्यात काँग्रेसचा बालेकिल्ला भेदून भाजपचा झेंडा रोवणारे माजी खासदार संजयकाका पाटील यांचे संघटन कौशल्य आणि प्रभाव आजही कायम असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनेक सदस्यांचा पाठिंबा महायुतीच्या बाजूने असल्याने धैर्यशील कदम यांचे पारडे अधिकाधिक जड होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

निवडणुकीच्या तोंडावर घोडेबाजार आणि फोडाफोडीच्या राजकारणाला आळा घालण्यासाठी भाजपने सातारा जिल्ह्यातील आपल्या समर्थक नगरसेवकांना सहलीवर पाठविल्याची माहिती समोर आली आहे. कोणतीही नाराजी किंवा मतांचे विभाजन होऊ नये, यासाठी पक्षाने आखलेले हे नियोजन चर्चेचा विषय ठरले आहे.

महायुतीतील काही स्थानिक नाराजीच्या चर्चा सुरू असल्या तरी अंतिम निर्णय नेतृत्वाच्या पातळीवर होणार असल्याने भाजपने मात्र विजयासाठी सर्व ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे सातारा–सांगली विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांचे पारडे दिवसेंदिवस अधिक भक्कम होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.