बालविवाहाच्या उंबरठ्यावरून
१५ वर्षीय बालिकेची सुटका
रहिमतपूर पोलिसांच्या तत्परतेमुळे १५ वर्षीय बालिकेला संरक्षण
रहिमतपूर पोलिसांची तातडीची कारवाई
बालविवाहात सहभागी होणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
संतोष शिराळे, सातारा |
रहिमतपूर पोलीस आणि महिला व बाल विकास विभागाच्या सतर्कतेमुळे एका १५ वर्षे ३ महिने वयाच्या अल्पवयीन बालिकेचा बेकायदेशीर बालविवाह वेळेत रोखण्यात आला. गावाबाहेरील मंदिरात विवाहाची सर्व तयारी पूर्ण झाली असतानाच पोलिसांनी धाड टाकून विवाह थांबवला आणि बालिकेला सुरक्षित संरक्षण मिळवून दिले.
दि. २६ जून रोजी रहिमतपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे यांना हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने संबंधित मंदिरात धाव घेतली. तेथे विवाहाची तयारी सुरू असून सुमारे २५ ते ३० नातेवाईक उपस्थित असल्याचे आढळले.
पोलिसांनी विवाह तात्काळ थांबवत मुलीच्या वयाची अधिकृत कागदपत्रांद्वारे पडताळणी केली. त्यावेळी मुलीचे वय केवळ १५ वर्षे ३ महिने असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कायदेशीर विवाहासाठी आवश्यक असलेल्या १८ वर्षांच्या वयोमर्यादेचे उल्लंघन होत असल्याने पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली. यानंतर कोरेगावच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी (CDPO) शारदा जाधव तसेच ग्रामविकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. महिला पोलिसांच्या मदतीने बालिकेला सुरक्षितपणे पोलीस ठाण्यात आणण्यात आले. महिला व बाल विकास विभागाच्या अहवालानुसार बालिकेला सातारा जिल्हा बाल कल्याण समितीसमोर (CWC) हजर करण्यात आले. समितीने तिला 'काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालिका' घोषित करत सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आदेश दिले. तसेच तिच्या शिक्षण, पुनर्वसन आणि समुपदेशनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, बाल विवाह प्रतिबंध अधिनियम, २००६ अंतर्गत १८ वर्षांखालील मुलीचा विवाह करणे, त्यासाठी मदत करणे किंवा प्रोत्साहन देणे हा गंभीर व अजामीनपात्र गुन्हा आहे. अशा प्रकरणांमध्ये पालक, नातेवाईक, भटजी, वाजंत्री, मंडप व्यावसायिक यांच्यासह संबंधित सर्वांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस प्रशासन किंवा १०९८ चाइल्डलाईन या टोल-फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले असून माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ही कारवाई प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे, पोलीस हवालदार प्रवीण बर्गे, शंकर घाडगे, महेश शेडगे, सुशांत शिंदे, महिला पोलीस हवालदार शितल सानप, पोलीस कॉन्स्टेबल समाधान देशमुख, संजय सपकाळ, तुषार काळंगे, महिला पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी घाडगे, शुभांगी पाटोळे, अर्पिता गायकवाड तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी शारदा जाधव यांनी संयुक्तपणे पार पाडली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून कौतुक केले आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!