पाचगणी-वाई मार्गावर दोन महाकाय वृक्ष कोसळले, दोन वाहने आणि चहाची टपरीचे मोठे नुकसान; तिघेजण थोडक्यात बचावले; जीवितहानी टळली

पाचगणी-वाई मार्गावर

दोन महाकाय वृक्ष कोसळले

दोन वाहने आणि चहाची टपरीचे मोठे नुकसान

तिघेजण थोडक्यात बचावले; जीवितहानी टळली

पाचगणी | प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाचगणीमध्ये आज सकाळी मोठी दुर्घटना घडली. पाचगणी-वाई मुख्य मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डनसमोर एक महाकाय पिंप्रण वृक्ष अचानक उन्मळून पडल्याने त्याच्या धडकेत दुसरे आंब्याचे झाडही मुळासकट कोसळले. या दुर्घटनेत दोन वाहने आणि एक चहाची टपरी पूर्णपणे चक्काचूर झाली. मात्र, प्रसंगावधान आणि नशीब बलवत्तर ठरल्याने तिघेजण थोडक्यात बचावले असून मोठी जीवितहानी टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, काटवली (ता. जावळी) येथील नितीन बेलोशे हे आपल्या वॅगनआर कारमधून (MH 11 BV 5925) पाचगणीतून वाईकडे जात होते. आंबेडकर गार्डनजवळ पोहोचताच समोर महाकाय वृक्ष कोसळताना दिसल्याने त्यांनी तत्काळ वाहन थांबवून मागे घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी दुसऱ्या झाडाची मोठी फांदी त्यांच्या कारवर कोसळली. विजेच्या ताराही वाहनावर पडल्याने बेलोशे काहीकाळ कारमध्येच अडकून पडले. कारची काच फुटल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली.

दरम्यान, बेलोशे यांच्या वाहनाच्या मागे धनंजय कासुर्डे हे ॲक्सेस दुचाकीवरून (MH 11 CD 4089) प्रवास करत होते. त्यांच्या दुचाकीवरही झाडाची फांदी कोसळली. मात्र, त्यांनी वेळीच गाडीवरून उडी मारल्याने त्यांचा जीव वाचला.

याच ठिकाणी आंब्याच्या झाडाखाली विनोद गुलाबराव कासुर्डे-पाटील यांची चहाची टपरी होती. बाहेर मोठा आवाज झाल्याचे लक्षात येताच ते तत्काळ टपरीबाहेर आले. काही क्षणांतच दोन्ही महाकाय झाडे त्यांच्या टपरीवर कोसळल्याने टपरीचे मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेत चारचाकी, दुचाकी आणि चहाची टपरी यांचे मिळून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच पाचगणी नगरपालिकेचे कर्मचारी, ‘एसओएस’चे स्वयंसेवक आणि महावितरणचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कारमध्ये अडकलेल्या नितीन बेलोशे यांची सुरक्षित सुटका करण्यात आली. झाडे रस्त्यावर कोसळल्यामुळे वाई-महाबळेश्वर मार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती. वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी न्यू इरा स्कूलमार्गे पर्यायी व्यवस्था करण्यात आली. मुसळधार पाऊस, दाट धुके आणि सतत सुरू असलेल्या रिमझिम सरींमुळे बचावकार्याला सुरुवातीला अडथळे आले. मात्र कर्मचाऱ्यांनी कटरच्या सहाय्याने झाडांच्या फांद्या हटवून रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला केला.

दरम्यान, पाचगणी-महाबळेश्वर परिसरात पावसाळ्यात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. धोकादायक व जीर्ण झालेल्या वृक्षांचे पावसाळ्यापूर्वी सर्वेक्षण करून आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने वेळीच उपाययोजना न केल्यास भविष्यात अधिक गंभीर दुर्घटना घडू शकतात, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments