बिल्किंट डिलिव्हरी बॉय निघाला घरफोड्या; सातारा शहर डी.बी. पथकाची धडक कारवाई, १३ लाखांचा ऐवज जप्त


बिल्किंट डिलिव्हरी बॉय

निघाला घरफोड्या


सातारा शहर डी.बी. पथकाची धडक कारवाई


१३ लाख १ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त


संतोष शिराळे, सातारा |

सातारा शहरातील शाहूनगर परिसरातील आमराई कॉलनीमधील शिवालय अपार्टमेंटमध्ये बंद घर फोडून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या सराईत चोरट्याला सातारा शहर पोलिसांच्या डी.बी. पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीतील सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि मोबाईल फोनसह तब्बल १३ लाख १ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.


अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव ओंकार नरेश बाबर (वय ३०) असे असून, तो सध्या दिव्यनगरी, पार्टे कॉर्नरच्या पाठीमागे, शाहूपुरी (सातारा) येथे राहत असून मूळचा उडतारे (ता. वाई, जि. सातारा) येथील आहे. दि. १५ जून २०२६ रोजी शाहूनगर येथील आमराई कॉलनीतील शिवालय अपार्टमेंटमधील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने चोरी केले होते. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथक आरोपीचा शोध घेत होते. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना एका संशयिताची माहिती मिळाली. मात्र, आरोपीचा निश्चित ठावठिकाणा नसल्याने त्याचा शोध घेणे आव्हानात्मक ठरत होते. गेल्या दोन दिवसांपासून डी.बी. पथक त्याच्या मागावर होते. पहाटेच्या सुमारास आरोपी चारचाकी वाहनातून जात असताना डी.बी. पथकाने त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. न्यायालयातून पोलीस कोठडी मिळाल्यानंतर चौकशीत त्याने घरफोडीची कबुली दिली.


तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली. आरोपी हा बिल्किंट कंपनीचा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. पार्सल वितरणाच्या निमित्ताने विविध भागात जात असताना तो बंद घरे हेरत असे आणि संधी साधून घरफोड्या करत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.


ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार निलेश यादव, निलेश जाधव, विक्रम माने, प्रविण कडव, पंकज मोहिते तसेच पोलीस कर्मचारी तुषार भोसले, सागर गायकवाड, सुहास कदम, सचिन रिटे, संतोष घाडगे, मच्छिंद्रनाथ माने, आशिकेष डोळस, वैभव माने, सुशांत कदम, सचिन आदमाने यांनी केली. सायबर विभागाचे प्रशांत मोरे आणि रामदास भास्करवाड यांनीही तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.




Post a Comment

0 Comments