कोयना धरणातील पाणीसाठा १३.३२ टक्क्यांवर,सातारा जिल्ह्यात पावसाची पुन्हा ओढ

 


सातारा जिल्ह्यात 

पावसाची पुन्हा ओढ

कोयना धरणातील पाणीसाठा १३.३२ टक्क्यांवर

महाबळेश्वरमध्ये किरकोळ सरी

संतोष शिराळे, सातारा |

सातारा जिल्ह्यात शनिवारी पावसाने पुन्हा विश्रांती घेतल्याचे चित्र दिसून आले. दिवसभर बहुतांश भागात ढगाळ वातावरण होते. दुपारच्या सुमारास सातारा शहरात मेघगर्जना झाली, मात्र पावसाची नोंद झाली नाही. तर महाबळेश्वरमध्ये केवळ २ मिमी आणि नवजा परिसरात १.५ मिमी पावसाची नोंद झाली.

सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार कोयना धरणाची पाणीपातळी २०३९.०७ फूट (६२१.६६५ मीटर) इतकी झाली आहे. धरणातील एकूण पाणीसाठा १४.०२ टीएमसी (१३.३२ टक्के) असून उपयुक्त पाणीसाठा ८.९० टीएमसी (८.८८ टक्के) इतका आहेधरण क्षेत्रात दिवसभर पावसाची विशेष नोंद झाली नाही. कोयना येथे हंगामातील एकूण १४५ मिमी, नवजा येथे २२८ मिमी आणि महाबळेश्वर येथे २०९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणात सध्या २३१ क्युसेक पाण्याची आवक सुरू असून वीजगृह किंवा नदीपात्रात कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही.

दरम्यान, सातारा येथील कमाल तापमान ३४.३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. हवेतील आर्द्रता ६९ टक्के होती. दुपारी २.४५ ते ३.३० या वेळेत मेघगर्जना झाली, मात्र पाऊस झाला नाही. महाबळेश्वरमध्ये कमाल तापमान २४.२ अंश सेल्सिअस, आर्द्रता ९५ टक्के आणि १.५ मिमी पावसाची नोंद झाली. तेथे दिवसभर धुक्याचीही स्थिती होती. हवामानातील बदल आणि पावसाची कमी झालेली तीव्रता लक्षात घेता, जिल्ह्यातील नागरिकांसह शेतकऱ्यांचे लक्ष आता पुढील काही दिवसांत होणाऱ्या पावसाकडे लागले आहे.

Post a Comment

0 Comments