शहीद अर्जुन जाधव यांना
शासकीय इतमामात
शहापूर येथे अखेरचा निरोप
उरी सेक्टरमधील अपघाती स्फोटात शहीद
अर्जुन जाधव अमर रहे"च्या घोषणा
सातारा : जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टर येथे देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना झालेल्या अपघाती स्फोटात कराड तालुक्यातील शहापूर गावचे वीर सुपुत्र जवान अर्जुन राजेंद्र जाधव शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर आज शहापूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भारतीय सैन्य दल आणि पोलीस दलाच्या तुकडीने हवेत बंदुकींच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानाला मानवंदना दिली. संपूर्ण परिसर "भारत माता की जय" आणि "अर्जुन जाधव अमर रहे" या घोषणांनी दुमदुमून गेला होता.
देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या अर्जुन जाधव यांच्या निधनाने संपूर्ण कराड तालुका, सातारा जिल्हा आणि महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. शूर, जिद्दी आणि राष्ट्रभक्त जवान आज आपल्यात नसले तरी त्यांचे शौर्य, त्याग आणि देशप्रेम प्रत्येक भारतीयाच्या मनात सदैव जिवंत राहणार आहे. अंत्यसंस्कारावेळी आमदार मनोज घोरपडे, आमदार डॉ. अतुल भोसले, माजी आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ओमकार कापले, गटशिक्षणाधिकारी प्रताप पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानाला श्रद्धांजली वाहिली.
वीर पत्नी सायली, अकरा महिन्यांचा मुलगा सर्वेश, वीर पिता राजेंद्र जाधव, वीर माता सुरेखा जाधव, भाऊ ऋषिकेश तसेच बहिणी रेश्मा चव्हाण व पूनम पाटील यांनी साश्रुपूर्ण वातावरणात अंतिम दर्शन घेतले. शहीद जवानाच्या पार्थिवावरील तिरंगा ध्वज सैन्याच्या जवानांनी कुटुंबीयांकडे सुपूर्द केला. त्यावेळी पत्नी, आई-वडील, भाऊ आणि कुटुंबीयांचा आक्रोश उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू आणणारा ठरला. यानंतर शहीद अर्जुन जाधव यांच्या पार्थिवाला मुखाग्नी देण्यात आला.
या वेळी लष्करातील आजी-माजी अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, ग्रामस्थ आणि हजारो नागरिक उपस्थित होते. देशासाठी दिलेले अर्जुन जाधव यांचे हे अमूल्य बलिदान कधीही विसरले जाणार नाही. त्यांच्या शौर्याची गाथा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असून, मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या या वीर जवानाला संपूर्ण महाराष्ट्राने अश्रुपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.



0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!