कराड हादरले!
वैवाहिक वादातून
जलसंपदा विभागाच्या
अभियंत्याची सुपारी देऊन हत्या
काही तासातच पत्नी व मेहुणा अटकेत
कराड पोलीस ठाण्याची कारवाई
कराड, प्रतिनिधी - संतोष शिराळे : वैवाहिक जीवनातील मतभेद आणि कौटुंबिक कलह किती टोकाला जाऊ शकतो, याचे धक्कादायक उदाहरण कराड शहरात समोर आले आहे. जलसंपदा विभागातील एका अभियंत्याची भररस्त्यात वाहनाखाली चिरडून हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणाचा अवघ्या काही तासांत छडा लावत कराड शहर पोलिसांनी हा अपघात नसून पूर्वनियोजित खून असल्याचे उघड केले आहे. या प्रकरणी मृत अभियंत्याची पत्नी आणि मेहुण्याला अटक करण्यात आली असून, सुपारी घेऊन हत्या करणाऱ्या दोन संशयितांचा शोध सुरू आहे. लक्ष्मण श्रीरंग मंडले (वय ५४, रा. मनव, ता. कराड) असे मृत अभियंत्याचे नाव आहे. तर पत्नी सुरेखा लक्ष्मण मंडले (वय ३६) आणि तिचा भाऊ संग्राम दिनकर चव्हाण (वय ४०, रा. सुरूल पेठ, ता. वाळवा, जि. सांगली) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
महिनाभरापासून सुरू होता कट
पोलिसांच्या माहितीनुसार, लक्ष्मण मंडले आणि त्यांच्या पत्नीमध्ये गेल्या काही काळापासून कौटुंबिक वाद सुरू होता. या वादातूनच सुरेखा मंडले हिने पतीची हत्या करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप आहे. यासाठी तिने भाऊ संग्राम चव्हाण याची मदत घेतली. दोघांनी मिळून महिनाभरापूर्वी मुंबईत जाऊन दोन व्यक्तींशी संपर्क साधत हत्येचा कट रचल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
अपघाताचा बनाव; प्रत्यक्षात थंड डोक्याने खून
शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास कराडमधील शिंदे हॉस्पिटल परिसरात ही घटना घडली. लक्ष्मण मंडले रस्त्यावरून जात असताना मागून आलेल्या एका अल्टो कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर आरोपींनी त्यांच्याजवळील सामान घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.मात्र काही वेळाने तीच कार पुन्हा घटनास्थळी परतली आणि रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या मंडले यांच्या अंगावर पुन्हा वाहन घालण्यात आल्याचे तपासात उघड झाले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघड झाला कट
घटनेनंतर सुरेखा मंडले हिने हा केवळ अपघात असल्याचा दावा केला होता. मात्र घटनास्थळावरील परिस्थिती, वाहनाची हालचाल आणि काही विसंगतींमुळे पोलिसांना संशय आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि तांत्रिक पुराव्यांची तपासणी सुरू केली. तपासाची दिशा स्पष्ट होताच सुरेखा मंडले हिला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
सुपारी किलर्सच्या शोधासाठी पाच पथके
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या बहीण-भावाला अटक करण्यात आली असली तरी प्रत्यक्ष हत्या करणाऱ्या दोन सुपारी किलर्सचा शोध अद्याप सुरू आहे. त्यासाठी कराड शहर पोलीस ठाण्याची तीन आणि स्थानिक गुन्हे शाखेची दोन अशी एकूण पाच पथके विविध भागांत रवाना करण्यात आली आहेत.
कराड परिसरात खळबळ
एका सुशिक्षित कुटुंबातील वैवाहिक वादाचे रूपांतर थेट हत्येच्या कटात झाल्याने कराडसह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अभियंत्याचा अशा पद्धतीने दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील पुढील तपास कराड शहर पोलीस करत आहेत.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!