सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत प्रचारात प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती चर्चेत

महायुतीत नाराजी? 

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत प्रचारात प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती चर्चेत

मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील हे अद्याप प्रचारापासून दूर

संतोष शिराळे, सातारा : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांच्यात थेट सामना रंगला असताना, महायुतीतील अंतर्गत नाराजीच्या चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद पाटील हे अद्याप प्रचारापासून दूर असल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे.

महायुतीकडे भाजपची ३७४, शिवसेनेची १०२ आणि राष्ट्रवादी काँग्रेसची १६२ अशी एकूण मोठी मतसंख्या असली, तरी भाजपच्या उमेदवाराच्या विजयासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मतांची निर्णायक भूमिका राहणार आहे. अशा परिस्थितीत महायुतीतील प्रमुख घटक पक्षांच्या मंत्र्यांची प्रचारातील अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरत आहे.

आतापर्यंत मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांनी उमेदवाराच्या प्रचारासाठी कोणतीही संयुक्त बैठक घेतलेली नाही किंवा प्रचारसभांमध्ये सक्रिय सहभागही दिसून आलेला नाही. त्यामुळे महायुतीत सर्व काही आलबेल आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी विविध भागांत संपर्क मोहीम सुरू ठेवली असून, महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांच्याकडूनही जोरदार प्रचार सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील समन्वयाचा अभाव विरोधकांकडून मुद्दा बनविला जात असून, आगामी काळात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते प्रचारात सक्रिय होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments