जल व्यवस्थापन व स्वच्छता
समितीच्या सभेत ग्रामीण
पाणीपुरवठ्याच्या प्रश्नांवर चर्चा
शामगाव आरोग्य केंद्रासाठी पाणी व्यवस्थापन
मेरवेवाडीसाठी बोरवेल मंजुरीची मागणी
आषाढी वारी आणि शेतकरी मार्गदर्शनावर भर
सातारा : जिल्हा परिषद सातारा येथे जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीची सर्वसाधारण सभा तसेच स्थायी समितीची बैठक गुरुवारी पार पडली. उपाध्यक्ष राजूभैय्या भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत ग्रामीण पाणीपुरवठा, आषाढी वारीचे नियोजन, शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि विविध विकासकामांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.
जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या सभेत ग्रामीण पाणीपुरवठा, पाणी गुणवत्ता, जलस्रोत संवर्धन, स्वच्छता सुविधा तसेच प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी कराड तालुक्यातील शामगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पाणी व्यवस्थापनाची व्यवस्था करण्याची तसेच मेरवेवाडी येथे बोरवेल मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली. कार्यक्षेत्रातील इतर गावांतील पाणीपुरवठ्याशी संबंधित प्रश्नही सभागृहासमोर मांडण्यात आले.
ग्रामीण भागातील पाणीटंचाई निवारण, नादुरुस्त योजनांची दुरुस्ती, नियमित पाणीपुरवठा आणि स्वच्छता सुविधांच्या विस्तारासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. प्रशासनाने याबाबत सकारात्मक भूमिका घेत कार्यवाहीचे आश्वासन दिले. दरम्यान, जिल्हा परिषद परिसरातील जुन्या लोकल बोर्ड इमारतीतील नव्याने तयार करण्यात आलेल्या समिती सभागृहात स्थायी समितीची सभा पार पडली. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे कोणतेही धोरणात्मक निर्णय घेण्यात आले नाहीत. मात्र, आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावरील सुविधा, नियोजन आणि प्रशासनाने घ्यावयाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
तसेच ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नांतून आषाढी वारीसाठी सातारा जिल्ह्याला २० कोटी ८२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याबद्दल सभेत अभिनंदन करण्यात आले. याशिवाय दुष्काळी भागांतील टँकरद्वारे पाणीपुरवठा, १५ जूनपासून सुरू होणाऱ्या प्राथमिक शाळांच्या प्रवेशोत्सवाचे नियोजन तसेच मान्सूनच्या उशिरामुळे शेतकऱ्यांना पेरणीबाबत योग्य मार्गदर्शन करण्याच्या विषयांवरही चर्चा झाली.
बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, समाजकल्याण सभापती ऋषिकेश धायगुडे, शिक्षण सभापती तेजस्विनी कदम, महिला व बालकल्याण सभापती ऋतुजा शिंदे, कृषी व पशुसंवर्धन व दुग्धशाळा सभापती लता कर्णे, विविध विषय समित्यांचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सभा संपल्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!