कै. दत्तात्रय कळंबे महाराज पतसंस्थेचा उद्या ३६ वा वर्धापन दिन

कै. दत्तात्रय कळंबे महाराज 

पतसंस्थेचा उद्या ३६ वा वर्धापन दिन

गुणवंत युवक-युवतींचा होणार नागरी सत्कार

पाचगणी, प्रतिनिधी : जावळी तालुक्यातील दापवडी येथील सामाजिक बांधिलकी जपणारी आणि सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी कै. दत्तात्रय कळंबे महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित (काटवली) उद्या, शनिवारी आपला ३६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करणार आहे. या निमित्ताने विविध स्पर्धा परीक्षा आणि शासकीय सेवांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून गाव व परिसराचे नाव उज्ज्वल करणाऱ्या गुणवंत युवक-युवतींचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे.

दापवडी येथील संस्थेच्या मुख्य कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला असून, विविध क्षेत्रांतील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. यंदा भारतीय वायूसेनेत निवड झाल्याबद्दल सई प्रतापराव पाटील, महाराष्ट्र लोहमार्ग पोलीस दलात निवड झाल्याबद्दल अजय अशोक साळुंखे आणि महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक पदावर निवड झाल्याबद्दल अक्षदा नथुराम रांजणे यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात येणार आहे. देशसेवा, सुरक्षा आणि शासकीय सेवेत यशस्वी वाटचाल करणाऱ्या या तरुणांमुळे दापवडीसह संपूर्ण जावळी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

संस्थेचे ज्येष्ठ संचालक बाबुराव रांजणे यांनी सांगितले की, शेतकरी, छोटे व्यावसायिक, महिला आणि युवकांना आर्थिक स्थैर्य व समृद्धी मिळावी या उद्देशाने वै. दत्तात्रय कळंबे महाराज यांच्या प्रेरणेने संस्थेची स्थापना करण्यात आली. विश्वासाची ३६ वर्षे यशस्वीपणे पूर्ण करताना संस्थेने केवळ आर्थिक व्यवहारांपुरते मर्यादित न राहता सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. दरवर्षी शालेय स्तरावरील गुणवंत विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविणाऱ्या युवकांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्याची परंपरा संस्था सातत्याने जपत आहे.

या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी दापवडी, काटवली, बेलोशी, रांजणी महू, वहागाव, शिंदेवाडी व परिसरातील सर्व सभासद, ठेवीदार, हितचिंतक व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे चेअरमन रविकांत बेलोशे, व्हा. चेअरमन हरिश्चंद्र गावडे आणि ज्येष्ठ संचालक बाबुराव रांजणे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments