'VB-GRAM G 2025'साठी
1 जुलैपासून जनजागृती
अभियान राबवणार
जावळी तालुक्यात सहा आठवड्यांचा विशेष व्यापक कार्यक्रम
जावळीचे गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील यांची माहिती
संतोष शिराळे, सातारा |
'विकसित भारत रोजगार व आजीविका हमी (ग्रामीण) अधिनियम २०२५' (VB-GRAM G) या नव्या कायद्याची माहिती ग्रामीण नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सातारा जिल्ह्यात सहा आठवड्यांचा व्यापक जनसंपर्क व जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. पंचायत समिती जावळी (मेढा) यांच्या वतीने एक जुलैपासून या अभियानाचे नियोजन करण्यात आले असून, माहिती, शिक्षण व संवाद (IEC) कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती जावळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील यांनी दिली आहे.
पाटील यांनी माहिती देताना सांगितले, भारत सरकारने ग्रामीण भागातील रोजगार, आजीविकेचे विविधीकरण आणि सामाजिक-आर्थिक सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी हा नवा कायदा लागू केला आहे. या कायद्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सातारा जिल्ह्यात सर्व तालुके व ग्रामपंचायत स्तरावर विशेष जनसंपर्क मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अभियानाचा प्रमुख उद्देश ग्रामीण नागरिकांना रोजगाराचे कायदेशीर हक्क, पारदर्शक वेतन वितरण, ग्रामपंचायतींची भूमिका आणि अंमलबजावणीची प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती देणे हा आहे.
कायद्याची प्रमुख वैशिष्ट्ये
प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला वर्षातून १२५ दिवसांच्या रोजगाराची वैधानिक हमी. मजुरीच्या विलंबित देयकावर नुकसानभरपाईची तरतूद. काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्त्याचा अधिकार. डीबीटीद्वारे (DBT) मजुरी थेट बँक खात्यात जमा होणार. अंमलबजावणीत ग्रामपंचायतींची अधिक प्रभावी भूमिका.
सहा आठवड्यांचे जनजागृती अभियान
एक जुलैपासून सुरू होणाऱ्या या मोहिमेअंतर्गत विविध आठवड्यांमध्ये माध्यम संवाद, हक्क संरक्षण प्रतिज्ञा दिन, 'विकसित भारत ग्राम संवाद', 'अधिकारापासून हक्कापर्यंत' जनजागृती रॅली, पंचायतराज प्रतिनिधी संवाद तसेच 'विकसित भारत कामगार सन्मान' अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामसभा, चौपाल, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, फलक प्रदर्शन, लोकप्रतिनिधींसोबत संवाद, तसेच १०० दिवसांहून अधिक रोजगार पूर्ण केलेल्या कामगारांचा सत्कार आदी उपक्रमांचा समावेश आहे.
ही मोहीम पूर्णपणे माहितीपर असून कोणत्याही प्रकारचा राजकीय प्रचार टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महिला, अनुसूचित जाती-जमाती तसेच दिव्यांग नागरिकांचा या अभियानात सक्रिय सहभाग वाढविण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. जावळी तालुक्यातील सर्व ग्रामस्थांनी या जनजागृती अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पंचायत समिती जावळीचे गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील यांनी शेवटी केले आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!