सातारा जिल्ह्यात मान्सूनची संथ वाटचाल; जूनअखेरीस सरासरी केवळ 32.9 टक्के पाऊस

सातारा जिल्ह्यात

मान्सूनची संथ वाटचाल

जूनअखेरीस सरासरी केवळ 32.9 टक्के पाऊस

संतोष शिराळे, सातारा |

सातारा जिल्ह्यात यंदा मान्सूनची सुरुवात संथ झाली असून जून महिन्याच्या अखेरपर्यंत सरासरीच्या तुलनेत केवळ 32.9 टक्के पावसाची नोंद झाली आहे. 28 जून रोजी दुपारी 12.49 वाजेपर्यंतच्या महसूल विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात सरासरी 181.2 मिमी पावसापैकी अवघा 59.7 मिमी (32.9%) पाऊस झाला आहे. गतवर्षी याच कालावधीत 226.3 मिमी (124.9 टक्के) पावसाची नोंद झाली होती.

जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस महाबळेश्वर तालुक्यात 199.8 मिमी (23.3 टक्के) झाला आहे. तर खटाव तालुक्यात 77.3 मिमी (87.8 टक्के) आणि फलटण तालुक्यात 69.8 मिमी (80.1 टक्के) पावसाची नोंद झाली आहे. दुसरीकडे पाटण तालुक्यात केवळ 40.3 मिमी (13.4 टक्के), सातारा तालुक्यात 41.1 मिमी (20.9 टक्के), कराडमध्ये 32.3 मिमी (23.5 टक्के) आणि कोरेगावमध्ये 40.1 मिमी (27.2 टक्के) पावसाची नोंद झाल्याने या भागात अद्यापही पावसाची मोठी तूट कायम आहे.

महाबळेश्वर सर्कलमध्ये सर्वाधिक पाऊस

सर्कलनिहाय आकडेवारीनुसार महाबळेश्वर सर्कलमध्ये 393.5 मिमी, पाचगणीमध्ये 138 मिमी तर तापोळा येथे 84.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. फलटण तालुक्यातील होळ सर्कलमध्ये 89.2 मिमी, तर खटाव तालुक्यातील वडूज (121.9 मिमी), निमसोड (121.4 मिमी) आणि पुसेसावळी (90.8 मिमी) येथे समाधानकारक पाऊस झाला आहे.

मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी इशारा जारी केला आहे. जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहून हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तालुकानिहाय पावसाची टक्केवारी

महाबळेश्वर – 23.3%

सातारा – 20.9%

जावळी – 49.1%

पाटण – 13.4%

कराड – 23.5%

कोरेगाव – 27.2%

खटाव – 87.8%

माण – 62.5%

फलटण – 80.1%

खंडाळा – 45.7%

वाई – 40.7%

Post a Comment

0 Comments