जुन्या भांडणाच्या रागातून खून;
दोन आरोपींना जन्मठेप
सातारा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड
संतोष शिराळे, सातारा : झारखंडमधील जुन्या वादाचा राग मनात धरून साताऱ्यात एका तरुणाचा निर्घृण खून केल्याप्रकरणी दोन आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.
राजेश बुधान टुडू (वय २५, मूळ रा. गिरीडीह, झारखंड, सध्या संभाजीनगर, सातारा) आणि गणेश सोनाराम मुर्मू (वय ३०, मूळ रा. गिरीडीह, झारखंड, सध्या संभाजीनगर, सातारा) अशी दोषी ठरलेल्या आरोपींची नावे आहेत.
सरकारी पक्षाच्या माहितीनुसार, १ जून २०२० रोजी सकाळी आरोपी राजेश टुडू याने राजू मुर्मू याला जेवणासाठी आपल्या खोलीवर बोलावले होते. तेथे दोन्ही आरोपी आणि राजू मुर्मू यांनी मद्यप्राशन केले. त्यानंतर झारखंडमध्ये असताना सायकल चोरीचा आरोप केल्याच्या कारणावरून झालेल्या जुन्या वादाची आठवण काढत आरोपी आणि मयत यांच्यात वाद झाला.
यानंतर दोन्ही आरोपींनी संगनमत करून राजू मुर्मू याला दुचाकीवरून देगाव (ता. सातारा) परिसरातील शिव नावाच्या ओढ्याजवळ नेले. तेथे त्याला ओढ्यात ढकलून मोठा दगड डोक्यावर व तोंडावर मारून त्याचा खून केला. तसेच ओळख पटू नये आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याची पँट काढून त्यातील मोबाईल आणि पाकीट घेऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४६८/२०२० अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक एस. व्ही. हंकारे यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश (डीजे-२) एस. आर. तांबोळी यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता गौरी लकडे, तत्कालीन अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता वैशाली पाटील तसेच अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील आशीर्वाद कुलकर्णी यांनी काम पाहिले. खटल्यादरम्यान १३ साक्षीदार तपासण्यात आले.
परिस्थितीजन्य पुरावा, साक्षीदारांचे जबाब तसेच सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांचा आधार घेत न्यायालयाने दोन्ही आरोपींना भारतीय न्याय संहितेतील (त्यावेळच्या भारतीय दंड विधान कलम ३०२, ३४) अंतर्गत दोषी ठरवत जन्मठेप आणि प्रत्येकी पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
या प्रकरणात पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले आणि सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, सहाय्यक फौजदार राजेंद्र वंजारी तसेच पैरवी अधिकारी शीतल भोसले व इतर कर्मचाऱ्यांनी पाठपुरावा केला.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!