कॉपर वायर आणि ट्रान्सफॉर्मर चोरणारी टोळी गजाआड ; २६ गुन्ह्यांची उकल, २० लाखांचा मुद्देमाल जप्त

कॉपर वायर आणि ट्रान्सफॉर्मर

चोरणारी टोळी गजाआड

२६ गुन्ह्यांची उकल, २० लाखांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखा व बोरगाव पोलिसांची संयुक्त कारवाई

पिकअप, दुचाकी, मोबाईलसह चोरीचे साहित्य हस्तगत

संतोष शिराळे, सातारा : बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतीपंपाच्या कॉपर वायर आणि डी.पी. (ट्रान्सफॉर्मर) चोरीच्या मालिकेचा पर्दाफाश करण्यात बोरगाव पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. संयुक्त कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली असून, तब्बल २६ गुन्ह्यांची उकल करत २० लाख २२ हजार ४८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्ह्यात सातत्याने घडणाऱ्या चोरीच्या घटनांची दखल घेत पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके आणि बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांना विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार घटनास्थळांचा सखोल अभ्यास, गोपनीय बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि सायबर तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी सापळा रचून हर्षद सुनील जाधव (रा. सासपडे), स्वप्नील संजय मगर (रा. ढोरोशी), विकास वाल्मिक कदम (रा. मरळोशी), विवेक विजय लादे (रा. सासपडे) आणि शेखर चंद्रकांत सावंत (रा. निवडे) या पाच आरोपींना अटक केली.

या चौकशीत आरोपींनी मुख्य सूत्रधार सागर चंद्रकांत मोरे (रा. भुडकेवाडी, ता. पाटण) आणि इतर साथीदारांच्या मदतीने बोरगाव, कोरेगाव, सातारा तालुका, सातारा शहर, भुईंज आणि उंब्रज पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कॉपर वायर आणि ट्रान्सफॉर्मर चोरीचे २६ गुन्हे केल्याची कबुली दिली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी गुन्ह्यात वापरण्यात आलेली एक पिकअप, चार मोटारसायकली, पाच मोबाईल, चोरीसाठी वापरलेले साहित्य, रोख रक्कम आणि चोरीचा मुद्देमाल असा एकूण २० लाख २२ हजार ४८२ रुपयांचा ऐवज जप्त केला. उकल झालेल्या २६ गुन्ह्यांमध्ये बोरगाव पोलीस ठाण्याचे ५, कोरेगावचे १०, सातारा तालुक्याचे ५, सातारा शहरचे २, भुईंजचे ३ आणि उंब्रज पोलीस ठाण्याचा एका गुन्ह्याचा समावेश आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, पोलीस उपनिरीक्षक एम. ई. पाटील, एस. एम. बसवंत तसेच बोरगाव पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरीत्या केली. 

सध्या अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एम. बसवंत करीत आहेत. तसेच मुख्य आरोपी सागर मोरे आणि इतर फरार साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments