नामदेवराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सातारा काँग्रेस अधिक बळकट होईल : पृथ्वीराज चव्हाण हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पाटील यांनी स्वीकारला अध्यक्षपदाचा पदभार

नामदेवराव पाटील यांच्या

नेतृत्वाखाली सातारा

काँग्रेस अधिक बळकट

होईल : पृथ्वीराज चव्हाण

हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पाटील यांनी स्वीकारला अध्यक्षपदाचा पदभार

संतोष शिराळे, सातारा : 

काँग्रेस पक्ष हा देशाच्या संविधानिक मूल्यांचा आणि लोकशाहीचा रक्षक आहे. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, उद्योग आणि सामाजिक सलोखा यांसारख्या गंभीर आव्हानांवर मात करण्यासाठी पक्ष संघटना अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. सातारा जिल्ह्याला काँग्रेसचा वैभवशाली वारसा लाभला असून नामदेवराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील संघटना अधिक मजबूत होईल, असा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विश्वास व्यक्त केला.

सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील (आप्पा) यांचा पदग्रहण व सत्कार सोहळा हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत उत्साहात पार पडला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांच्या हस्ते नामदेवराव पाटील यांनी जिल्हाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.

या कार्यक्रमाला युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हनमंत पवार, काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भानुदास माळी, जिल्हा परिषद सदस्या सौ. सुनंदा पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अजितराव पाटील व राजेंद्र शेलार, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, रणजितसिंह देशमुख, महिला जिल्हाध्यक्षा सुषमा राजेघोरपडे, श्रीकांत चव्हाण, प्रदीप जाधव, अशोकराव पाटील, बाबुराव पवार, बाबासाहेब कदम, इंद्रजीत चव्हाण, संजय तडाखे, जयदीप शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. प्रारंभी अजितराव पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर सूत्रसंचालन धैर्यशील सुपले यांनी केले.

प्रदेश प्रवक्ते हनमंत पवार यांनी आपल्या भाषणात राज्य व केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत महिलांवरील अत्याचार, महागाई, बेरोजगारी आणि सीमासुरक्षेच्या प्रश्नांवर सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला.

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी सातारा जिल्हा काँग्रेसच्या ऐतिहासिक परंपरेचा उल्लेख करत नव्या पिढीला काँग्रेसशी जोडण्याची गरज व्यक्त केली. साताऱ्याने राज्य आणि देशाला नेतृत्व दिले असून पुन्हा एकदा काँग्रेसच्या माध्यमातून जिल्हा राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

माजी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी आदरणीय पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वामुळे सातारा जिल्ह्यात काँग्रेसचा विचार आजही मजबूत असल्याचे सांगितले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. सुनंदा पाटील यांचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हनमंत पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच काँग्रेसच्या ओबीसी विभागाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भानुदास माळी यांचा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना भानुदास माळी यांनी सामान्य कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी देण्याची पृथ्वीराज चव्हाण यांची कार्यपद्धती अधोरेखित केली.

नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील यांनी आपल्या मनोगतात पक्षाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार मानत, पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात काँग्रेस संघटना अधिक बळकट करण्यासाठी आणि प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या सोहळ्यास जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील काँग्रेस पदाधिकारी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयूआय, सेवा दल, माजी लोकप्रतिनिधी तसेच हजारो कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. कार्यक्रमातून सातारा जिल्ह्यात काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. 

Post a Comment

0 Comments