प्रभुचीवाडीत घरफोडी; ७३ हजारांची रोकड लंपास अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

प्रभुचीवाडीत घरफोडी; 

७३ हजारांची रोकड लंपास,

अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

सिमेंटचा दरवाजा फोडून चोरट्यांचा घरात प्रवेश

संतोष शिराळे, सातारा : जावली तालुक्यातील प्रभुचीवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत ७३ हजार रुपयांची रोकड आणि काही जुन्या साड्या चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभुचीवाडी (ता. जावली) येथील शेतकरी दिनकर हरिबा शिवणकर (वय ६५) यांच्या राहत्या घरी ही घटना घडली. १८ जून रोजी रात्री १० वाजल्यापासून १९ जून रोजी पहाटे १.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराच्या पाठीमागील गोठ्याचा सिमेंटचा दरवाजा फोडला. तसेच लाकडी दरवाज्याचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.यानंतर घरातील ७३ हजार रुपयांची रोख रक्कम आणि सात ते आठ जुन्या वापरातील साड्या असा ऐवज लंपास करण्यात आला. चोरीची माहिती समोर आल्यानंतर दिनकर शिवणकर यांनी मेढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

याप्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १२८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५ व ३३१(४) अंतर्गत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार यादव करीत आहेत.

Post a Comment

0 Comments