सराईत घरफोड्या चोरट्याच्या टोळीचा पर्दाफाश २७.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त, सहा गुन्ह्यांची उकल

सराईत घरफोड्या 

चोरट्याच्या टोळीचा पर्दाफाश 

२७.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त, सहा गुन्ह्यांची उकल

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी

मुख्य आरोपीवर विविध जिल्ह्यांत १९ गुन्हे दाखल

संतोष शिराळे, सातारा : सातारा जिल्ह्यातील वाढत्या घरफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई करत अभिलेखावरील सराईत चोरट्याच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सहा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून, सुमारे २७ लाख ६५ हजार ४७६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी सहायक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना केली होती. या पथकाने गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि घटनास्थळावरील भौतिक पुराव्यांच्या आधारे मेढा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडी प्रकरणाचा तपास करत अभिलेखावरील सराईत गुन्हेगार महेश भिमा शिंदे (वय ३२, रा. शाहूनगर, सांगवी, ता. फलटण) याच्यापर्यंत धागेदोरे पोहोचवले.

सलग तीन दिवस विविध ठिकाणी छापे टाकूनही आरोपी पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर ८ जून २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सातारा शहरातील संगमनगर परिसरातील कॅनॉल भागात सापळा रचून त्याचा पाठलाग करत पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले. पोलिस कोठडीदरम्यान केलेल्या सखोल तपासातून आरोपीच्या साथीदारांची माहिती समोर आली आणि मेढा, वाई, भुईंज, फलटण ग्रामीण व कोरेगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण सहा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले.

या कारवाईत सुमारे दहा तोळे वजनाचे १५ लाख ९ हजार २०० रुपयांचे सोन्याचे दागिने, ५१ हजार २७६ रुपयांचे चांदीचे दागिने, गुन्ह्यात वापरण्यात आलेली १२ लाख रुपये किंमतीची कार तसेच मोबाईल हँडसेट असा एकूण २७ लाख ६५ हजार ४७६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेला महेश शिंदे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध विविध जिल्ह्यांत घरफोडी आणि चोरीचे एकूण १९ गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहायक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने केली.



Post a Comment

0 Comments