कोयना धरणातील
पाणीसाठा ४० वर्षांत
दुसऱ्यांदा नीचांकी
मान्सूनच्या संभाव्य खंडामुळे चिंता वाढली
संतोष शिराळे, सातारा : कोयना धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला असून, गेल्या ४० वर्षांत दुसऱ्यांदा धरणातील पाणी इतके कमी झाल्याने अनेक जुनी गावे, घरे, मंदिरे, बाजारपेठा, शेतीवाडी आणि ऐतिहासिक अवशेष पुन्हा उघड्यावर आले आहेत. त्यामुळे पुनर्वसित झालेल्या गावांतील ज्येष्ठ नागरिक आणि तरुण पिढी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या परिसराला भेट देत आहेत.
१४ जून २०२६ रोजी सकाळी ८ वाजेच्या नोंदीनुसार, कोयना धरणाची पाणीपातळी २०४० फूट ६ इंच (६२१.९४४ मीटर) इतकी असून, एकूण (ग्रॉस) पाणीसाठा १४.३३ टीएमसी (१३.६२ टक्के) आणि उपयुक्त (लाईव्ह) पाणीसाठा ९.२१ टीएमसी (९.१९ टक्के) इतका आहे. धरण क्षेत्रात अद्याप समाधानकारक पावसाची नोंद झालेली नाही. कोयना येथे १३ मिमी, नवजा येथे ७४ मिमी आणि महाबळेश्वर येथे २३ मिमी इतका हंगामी पाऊस झाला असून, रविवारी सकाळपर्यंत गेल्या २४ तासांत कोणतीही पावसाची नोंद झालेली नाही. धरणात नवीन पाण्याची आवक शून्य क्युसेक्स असून, कोयना जलविद्युत प्रकल्पातून १,०५० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
धरणातील पाणी कमी झाल्याने परिसरात पाणी पिण्यासाठी येणारी वन्य जनावरेही आता सहजपणे दिसू लागली आहेत. दरम्यान, हवामान तज्ज्ञांकडून पुढील दहा दिवस मान्सूनच्या पावसामध्ये मोठा खंड पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असल्याने चिंता वाढली आहे. जागतिक हवामान मॉडेल्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अंदाजानुसार, मान्सूनची चक्रीय प्रणाली कमकुवत होण्याची शक्यता असून कोरड्या हवेच्या प्रभावामुळे पश्चिम घाट, पश्चिम किनारपट्टी, मध्य भारत तसेच द्वीपकल्पीय भारतातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कमी राहू शकतो. परिणामी सिंचनाच्या सुविधा नसलेल्या भागांमध्ये खरीप पेरण्या लांबणीवर पडण्याची शक्यता असून, शेतकरी वर्गासाठी ही परिस्थिती चिंताजनक मानली जात आहे.
सध्या उपलब्ध संकेतांनुसार २० जूननंतर मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असली, तरी त्याबाबत अद्याप निश्चितता नसल्याचे हवामान अभ्यासकांनी नमूद केले आहे. त्यातच 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने पुढील काही दिवसांतील हवामान घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. दरम्यान, सातारा हवामान केंद्राच्या (MO Satara) नोंदीनुसार किमान तापमान २४.२ अंश सेल्सिअस, सापेक्ष आर्द्रता ६४ टक्के असून, गेल्या २४ तासांत पावसाची नोंद शून्य मिलीमीटर इतकी झाली आहे. हंगामातील एकूण पर्जन्यमान १३.३ मिमी इतके नोंदविण्यात आले आहे.


0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!