अवघ्या १४ व्या वर्षी 'अजिंक्यकन्या' धैर्याची धुरंधर कामगिरी


अवघ्या १४ व्या वर्षी

'अजिंक्यकन्या' धैर्याची

धुरंधर कामगिरी

प्रतिकूलतेवर मात करत युनाम शिखर सर

साताऱ्याच्या धैर्या कुलकर्णीची गिर्यारोहण क्षेत्रात दमदार झेप

सातारा : जिद्द, चिकाटी आणि धैर्य यांच्या जोरावर अशक्य वाटणारी स्वप्नेही साकार करता येतात, हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे साताऱ्याच्या 'अजिंक्यकन्या' धैर्या ज्योती विनोद कुलकर्णी हिने. एव्हरेस्ट बेस कॅम्प, किलीमंजारो आणि माऊंट एलब्रुस ही जागतिक कीर्तीची शिखरे सर केल्यानंतर आता अवघ्या १४ वर्षीय धैर्याने हिमाचल प्रदेशातील तब्बल ६,१११ मीटर (२०,०४९ फूट) उंचीचे आव्हानात्मक युनाम शिखर यशस्वीरित्या सर करत नवा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे.

गिर्यारोहण क्षेत्रात साताऱ्याचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणाऱ्या धैर्याची ही आजवरची सर्वोत्तम कामगिरी मानली जात आहे. लहानपणापासूनच डोंगर, दऱ्या आणि शिखरांविषयी आकर्षण असलेल्या धैर्याने सातत्यपूर्ण मेहनत, प्रशिक्षण आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ही उंच भरारी घेतली आहे. वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी धैर्याने एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहिम यशस्वीरित्या पूर्ण केली होती. ५,५४५ मीटर उंची गाठताना तिला अनेक शारीरिक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, सर्व संकटांवर मात करत तिने मोहिम पूर्ण केली. पालकांशिवाय एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहिम पूर्ण करणाऱ्या अल्पवयीन मुलींमध्ये तिची गणना केली जाते. धैर्याने आफ्रिका खंडातील सर्वोच्च ५,८५० मीटर उंचीचे किलीमंजारो शिखर सर केले. उणे तापमान, कमी ऑक्सिजन आणि कठीण हवामानाचा सामना करत तिने हे आव्हान पेलले. त्यानंतर युरोप खंडातील ५,६४२ मीटर उंचीचे माऊंट एलब्रुस शिखरही तिने यशस्वीरित्या सर केले.

अपयशाला बनवले यशाची पायरी

गत महिन्यात धैर्याने हिमाचल प्रदेशातील फ्रेंडशिप पीक सर करण्याचा प्रयत्न केला. शिखर अवघ्या ३०० ते ४०० मीटर अंतरावर असताना खराब हवामान आणि बर्फवृष्टीमुळे तिला माघार घ्यावी लागली. मात्र, या अपयशाने खचून न जाता तिने त्याच अनुभवातून प्रेरणा घेत अधिक उंच आणि अधिक आव्हानात्मक असलेल्या युनाम शिखराची मोहिम हाती घेतली. २२ मे रोजी सुरू झालेली ही मोहिम ५ जून रोजी यशस्वीरीत्या पूर्ण झाली. हिमाचल प्रदेशातील पीर पंजाल पर्वतरांगेत, बारालाचाला खिंडीजवळ असलेले युनाम शिखर ६ हजार मीटरपेक्षा अधिक उंच असून ते सर करण्यासाठी विशेष तांत्रिक कौशल्याची आवश्यकता असते. धैर्याने हे आव्हान यशस्वीपणे पूर्ण करत आपली क्षमता सिद्ध केली.

सहा वर्षांच्या मेहनतीचे फळ

धैर्याने आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक डॉ. हेमंत लिऊआ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रेरणेतून युनाम शिखर मोहिम पूर्ण केली. डॉ. सुरभी लिऊआ, प्रियांका मोहिते, कैलास बागल आणि डॉ. शीतल बेबी यांचेही तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले. गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने ट्रेकिंग आणि गिर्यारोहणाचा सराव करणाऱ्या धैर्याने राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सध्या ती साताऱ्यातील गुरुकुल शाळेत इयत्ता नववीत शिक्षण घेत आहे. सातारा जनता सहकारी बँकेचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी आणि शिक्षिका ज्योती कुलकर्णी यांची ती कन्या आहे. अल्पवयात जागतिक स्तरावरील अनेक शिखरे सर करून धैर्या कुलकर्णी आज साताऱ्याच्या नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.


धैर्याने सर केलेली महत्त्वाची शिखरे

- एव्हरेस्ट बेस कॅम्प

- किलीमंजारो

- माऊंट एलब्रुस

- युनाम शिखर

- कळसूबाई

- गिरनार

- सह्याद्रीतील अनेक गडकिल्ले 

- नर्मदा उत्तरवाहिनी परिक्रमा


"धरासे चढकर गगन को छुआ..."

"पोटच्या गोळ्याला आकार देण्याचे कर्तव्य आम्ही पार पाडत आहोत, तर आई-वडिलांनी दिलेले नाव सार्थ करण्याचे काम धैर्या करत आहे. आता ती केवळ आमची मुलगी नसून 'अजिंक्यकन्या' आणि 'शिखरकन्या' म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे. तिच्या या यशाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे," अशी भावना धैर्याचे वडील विनोद कुलकर्णी आणि आई ज्योती कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments