कराड उड्डाणपुलाचे काम

युद्धपातळीवर पूर्ण करा

खासदार उदयनराजे भोसले यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

कराड : सातारा लोकसभा मतदारसंघातील कराड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या बांधकामाची पाहणी करण्यात आली. यावेळी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेत नागरिकांच्या सुरक्षिततेसह कामाला अधिक गती देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

कराड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या सहापदरी उड्डाणपुलाची एकूण लांबी ३.४७ किलोमीटर आहे. शेंद्रे ते नेर्ले या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचा हा महत्त्वाचा भाग असून संपूर्ण प्रकल्पाची किंमत सुमारे २२२० कोटी रुपये आहे. त्यापैकी उड्डाणपुलासाठी सुमारे ४५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. उड्डाणपुलाचे काम दर्जेदार व सुरक्षित पद्धतीने पूर्ण करून नागरिकांसाठी लवकरात लवकर खुले करण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही तत्काळ करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. तसेच बांधकामादरम्यान सुरक्षिततेच्या सर्व निकषांची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला.

यावेळी बोलताना, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून साकार होत असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कराड शहरासह राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत, वेगवान आणि अडथळामुक्त होण्यास या प्रकल्पाची मदत होणार असून अपघातांचे प्रमाणही कमी होईल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला. या पाहणी दौऱ्यावेळी कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, माजी आमदार आनंदराव पाटील, सुनील काटकर, काका धुमाळ, नयन निकम, चिन्मय कुलकर्णी, ॲड. विनित पाटील आणि अभिजित गावडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.