शिवसेना-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर भाजपचा दबाव : अभयसिंह जगताप यांचा गंभीर आरोप



शिवसेना-राष्ट्रवादीच्या

मंत्र्यांवर भाजपचा दबाव

महाआघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांचा गंभीर आरोप

बहुमत असूनही भाजप घाबरले; पराभवाच्या भीतीने मतदार सहलीला पाठवले

तर भाजपच्या नेत्यांना महायुतीतील मंत्र्यांच्या घरांचे उंबरठे झिजवावे लागले नसते

संतोष शिराळे, सातारा : सांगली–सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांवर आणि मित्रपक्षांतील मंत्र्यांवर भाजपकडून दबाव आणला जात असून, भाजप उमेदवाराला मिळणारा पाठिंबा हा स्वेच्छेने नसून दबावपोटी असल्याचा खळबळजनक आरोप महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभयसिंह जगताप यांनी केला आहे.

मोठ्या शक्तीशी सामना करण्यासाठी मी खंबीरपणे उभा राहिलो आहे. भाजपसारखा राक्षस देशाला पूर्णपणे गिळंकृत करण्याच्या तयारीत असून, लोकशाहीला गुलामगिरीकडे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे पुढच्या पिढीच्या भवितव्याचा विचार करून लोकांनी माझ्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

गेल्या बारा वर्षांत देशातील समता आणि बंधुता धोक्यात आली असल्याचा आरोप करत त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि मतदारांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन केले. मतदान पूर्णपणे गुप्त राहणार असल्याने स्वाभिमानाच्या भूमिकेतून निर्णय घ्यावा, असेही त्यांनी म्हटले.

भाजपकडे ६०० हून अधिक मते असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात पराभवाच्या भीतीनेच मतदारांना सहलीवर पाठविण्याची वेळ आली आहे. "विरोधकांकडे इतके बहुमत असेल तर ते घाबरले का?" असा सवाल उपस्थित करत जगताप म्हणाले, "महायुतीमध्येच संभ्रमावस्था आहे आणि सर्वांच्या मनातील उमेदवार मीच आहे." त्यामुळे नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांनी निडरपणे मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.

भाजपचा उमेदवार सहज विजयी होणार असता, तर भाजपच्या नेत्यांना मंत्री मकरंद पाटील आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्या घरांचे उंबरठे झिजवण्याची गरज पडली नसती, असा टोला त्यांनी लगावला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतदारांनी स्वाभिमानाचा विचार करून मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी त्यांनी महायुतीवर जोरदार हल्लाबोल करत, "जर चुकून महायुतीचा उमेदवार विजयी झाला, तर विजय मिरवणुकीत पिस्तूल दाखवले जाईल, गुलाल उधळला जाईल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतील लोकप्रतिनिधींना विचारातही घेतले जाणार नाही. त्यावेळी तुम्हाला विचारले सुद्धा जाणार नाही. यावेळी दाखवलेला पिस्तूल हा फलटण, सातारा, वाई आणि पाटणच्या दिशेने असेल. त्यावेळेस भाजपची रणनीती काय होती, हे समजेल," असा दावा त्यांनी केला.

"ही निवडणूक एकतर्फी झाली असती, तर भाजपच्या नेत्यांनी मंत्री मकरंद पाटील आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्या घरांचे उंबरठे झिजवले असते का?" असा सवाल उपस्थित करत जगताप म्हणाले, "भाजपला आम्ही आमची ताकद दाखवून दिली आहे. ही निवडणूक एकतर्फी नाही. महायुतीतील अंतर्गत अस्वस्थता आणि मित्रपक्षांवरील दबाव यामुळेच भाजपची धावपळ सुरू आहे."

दरम्यान, अभयसिंह जगताप यांच्या या आक्रमक आरोपांमुळे सांगली–सातारा विधान परिषद निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांची पातळी आणखी तापली असून, महायुतीतील अंतर्गत समीकरणांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

Post a Comment

0 Comments