मतदान शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज : जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष

सांगली-सातारा मतदारसंघ विधान परिषद निवडणूक 2026

मतदान प्रक्रिया शांततेत 

पार पाडण्यासाठी 

निवडणूक यंत्रणा सज्ज 

जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष यांची माहिती

सांगली जिल्ह्यात 5 तर सातारा जिल्ह्यात 7 मतदान केंद्रे

संतोष शिराळे, सांगली/सातारा : सांगलीसह सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ विधान परिषद निवडणूक 2026 साठी गुरूवार, दि, 18 जून 2026 रोजी सांगली जिल्ह्यातील 5 व सातारा जिल्ह्यातील 7 अशा एकूण 12 मतदान केंद्रांवर सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. मतदान प्रक्रिया शांततेत, पारदर्शक व निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिली.

निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी सहाय्य करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच उपविभागीय अधिकारी खानापूर-विटा, वाळवा आणि जत यांची क्षेत्रिय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, मतदानासाठी प्रत्येक केंद्रावर एक केंद्राध्यक्ष व अधिक 4 असे एकूण 5 या प्रमाणात मनुष्यबळाची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच एक टीम राखीव ठेवण्यात आली आहे. मतदान केंद्र परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तसेच मतदान केंद्रांच्या परिसरात भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

 निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, निवडणुकीसाठी नियुक्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे. मतदान केंद्रांवर मूलभूत सुविधांची उपलब्धता, मतदान साहित्याचे वितरण, वाहतूक व्यवस्था तसेच दळणवळण यंत्रणा सज्ज आहे. आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीच्या दृष्टीने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 

मतपेट्या रवाना

मतदान केंद्रावर नियुक्त पथके 24 जंबो मतपेट्या घेऊन रवाना झाले आहेत. सांगली जिल्ह्यातील पाच व सातारा जिल्ह्यातील 7 मतदान केंद्रांसाठी प्रत्येकी दोन याप्रमाणे मतपेट्या रवाना करण्यात आल्या. 

सूक्ष्म निरीक्षकांचे प्रशिक्षण

दरम्यान, निवडणूक निरीक्षक डॉ. अमित सैनी यांच्या उपस्थितीत आज निवडणुकीसाठी नियुक्त सूक्ष्म निरीक्षकांचे प्रशिक्षण घेण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या या प्रशिक्षणास जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे आदि उपस्थित होते.

मतदान केंद्रे खालीलप्रमाणे :

मतदान केंद्राचे ठिकाण, ज्या इमारतीत मतदान केंद्र असेल ती इमारत आणि ज्या स्थानिक प्राधिकारीचे मतदार मतदान करण्यास पात्र आहेत, त्या प्राधिकारीचे नाव यांची अनुक्रमे यादी पुढीलप्रमाणे : 

सांगली जिल्ह्यातील मतदान केंद्रे

1) कडेगाव - तहसील कार्यालय, कडेगाव, पात्र मतदार - कडेगाव नगरपंचायत, कडेगाव व पलूस नगरपरिषद, पलूस.

2) विटा - उपविभागीय अधिकारी, खानापूर भाग, विटा यांचे कार्यालय, पात्र मतदार - विटा नगरपरिषद, विटा, खानापूर नगरपंचायत, खानापूर, आटपाडी नगरपंचायत, आटपाडी, तासगाव नगरपरिषद, तासगाव.

3) ईश्वरपूर - तहसील कार्यालय, वाळवा, ईश्वरपूर, पात्र मतदार – उरूण ईश्वरपूर नगरपरिषद उरूण ईश्वरपूर, आष्टा नगरपरिषद, आष्टा, शिराळा नगरपंचायत, शिराळा.

4) सांगली - अपर तहसील कार्यालय, सांगली, जुना पुरवठा विभाग, पात्र मतदार - जिल्हा परिषद, सांगली, सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका.

5) जत - तहसील कार्यालय, जत, पात्र मतदार - जत नगरपरिषद, जत, कवठेमहांकाळ नगरपंचायत, कवठेमहांकाळ. 

सातारा जिल्ह्यातील मतदान केंद्रे

1) वाई – तहसिल कार्यालय वाई, पात्र मतदार – नगरपरिषद वाई, गिरीस्थान नगरपरिषद महाबळेश्वर, गिरीस्थान नगरपरिषद पाचगणी, नगरपंचायत खंडाळा, नगरपंचायत लोणंद.

2) फलटण – तहसिल कार्यालय फलटण, पात्र मतदार – नगरपरिषद फलटण.

3) दहिवडी – तहसिल कार्यालय माण, पात्र मतदार – नगरपंचायत दहिवडी, नगरपंचायत वडूज, नगरपरिषद म्हसवड.

4) कोरेगांव – तहसिल कार्यालय कोरेगांव, पात्र मतदार – नगरपंचायत कोरेगांव, नगरपरिषद रहिमतपूर.

5) सातारा – तहसिल कार्यालय सातारा, पात्र मतदार – जिल्हा परिषद सातारा, नगरपरिषद सातारा, नगरपंचायत मेढा.

6) पाटण – तहसिल कार्यालय पाटण, पात्र मतदार – नगरपंचायत पाटण.

7) कराड – तहसिल कार्यालय कराड, पात्र मतदार – नगरपरिषद कराड, नगरपंचायत मलकापूर.

एकूण मतदार संख्या 895

या निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यातील एक जिल्हा परिषद, 9 नगरपरिषदा आणि 7 नगरपंचायतीमधील 240 पुरूष मतदार आणि 232 स्त्री मतदार असे सातारा जिल्ह्यातील एकूण 472 मतदार आहेत. तर सांगली जिल्ह्यातील एक महानगरपालिका, एक जिल्हा परिषद, 5 नगरपरिषदा आणि 7 नगरपंचायतींमधील एकूण 203 पुरूष मतदार आणि 220 स्त्री मतदार असे एकूण 423 मतदारांची संख्या आहे. दोन्ही जिल्ह्यांचे मिळून एकूण 443 पुरूष, 452 स्त्री मतदार असे एकूण 895 मतदार आहेत. 

मतदान केंद्रात मोबाईल, कॅमेरा घेऊन जाण्यास मनाई

मतदान केंद्रात कोणत्याही व्यक्तीस फोटो / चित्रीकरण करण्यासाठी मोबाईल अथवा कॅमेरा घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तरी या सूचनांचे पालन करून सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे. या सूचनांचे उल्लंघन केल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment

0 Comments