मतदानाच्या पूर्वसंध्येला जलमंदिरावर गुप्त खलबते; उदयनराजे-जयकुमार गोरे भेटीने राजकीय चर्चांना उधाण

मतदानाच्या पूर्वसंध्येला

जलमंदिरावर गुप्त खलबते

उदयनराजे-जयकुमार गोरे भेटीने राजकीय चर्चांना उधाण

धैर्यशील कदम यांच्या विजयासाठी महायुतीचे ‘वॉर रूम’ सक्रिय!

समन्वय समितीचे प्रमुख सुनील काटकर यांचीही उपस्थिती

संतोष शिराळे, सातारा : सांगली–सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी १८ जून रोजी मतदान होत असताना, त्याच्या पूर्वसंध्येला खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्यात जलमंदिर पॅलेस येथे झालेल्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. समन्वय समितीचे प्रमुख तथा सातारा जिल्ह्यातील महायुतीचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे सुनील तात्या काटकर यांच्या उपस्थितीत झालेली ही बैठक आगामी मतदानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

भाजपचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम यांच्या विजयासाठी सातारा आणि सांगली जिल्ह्यात महायुतीची यंत्रणा पूर्ण ताकदीने कामाला लागली असून, खासदार उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, आमदार अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे तसेच सुनील तात्या काटकर हे समन्वयाची सूत्रे हाताळत असल्याची चर्चा आहे.

१८ जूनच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर जलमंदिरावर झालेल्या या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसह सातारा जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, महायुतीतील समन्वय, तसेच विकासकामांच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. ग्रामीण विकास, पायाभूत सुविधा आणि जनहिताच्या विविध विषयांवर सकारात्मक विचारविनिमय झाल्याचे सांगण्यात आले.

विशेष म्हणजे, सातारा जिल्ह्यातील महायुतीमध्ये भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसोबत प्रभावी समन्वय साधत धैर्यशील कदम यांच्या विजयासाठी मजबूत वातावरण तयार केल्याचे मानले जात आहे. मित्रपक्षांमधील समन्वय अधिक दृढ करण्यासाठी आणि मतदानाच्या दिवशी कोणतीही ढिलाई राहू नये, यासाठीच जलमंदिरावरील ही बैठक झाल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

यावेळी सुनील तात्या काटकर, काका धुमाळ, लक्ष्मण कडव, बाळासाहेब ढेकणे, बाळासाहेब राक्षे, कुलदीप क्षीरसागर, ॲड. विनीत पाटील, सचिन नलावडे, सनी भोसले आणि अमोल मोरे उपस्थित होते.

मतदानाच्या अवघ्या काही तासांपूर्वी महाराष्ट्रातील प्रभावी नेतृत्व मानले जाणारे खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्यात झालेल्या या बंदद्वार बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, महायुतीच्या पुढील रणनीतीचा हा महत्त्वाचा भाग असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सातारा–सांगली विधान परिषद निवडणुकीत महायुतीची एकजूट आणि समन्वय अधिक मजबूत झाल्याचे संकेत या बैठकीतून मिळाल्याचे बोलले जात आहे.

Post a Comment

0 Comments