मायणी–विटा रोडलगत
१७ लाखांचा बेकायदेशीर
स्फोटक साठा जप्त
स्थानिक गुन्हे शाखा व वडूज पोलिसांची धडाकेबाज कारवाई
जिलेटिनच्या १,८०० कांड्या, डेटोनेटर्ससह तीन वाहने जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
संतोष शिराळे, सातारा |
सातारा जिल्ह्यात बेकायदेशीरपणे स्फोटक पदार्थांची वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखा आणि वडूज पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तब्बल १७ लाख ९ हजार ९०० रुपयांचा स्फोटक साठा व तीन वाहने जप्त केली. या प्रकरणी तिघांविरुद्ध वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी विशेष पथक तयार केले होते. २६ जून रोजी मायणी–विटा रोडलगत गरवारे वस्ती येथे दोन बुलेरो वाहनांतून जिलेटिन व इतर स्फोटक पदार्थांची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने वडूज पोलीस स्टेशनच्या पथकासह २७ जून रोजी मध्यरात्री १२.१० वाजता घटनास्थळी छापा टाकला. संशयित वाहनांची तपासणी केली असता "Super Power 90 NX – Danger Explosive" असे लिहिलेले खाकी रंगाचे बॉक्स आढळले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDS) आणि फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले.
बीडीएस पथकातील श्वान 'आझाद' याने बॉक्समध्ये स्फोटके असल्याचे निश्चित केल्यानंतर पोलिसांनी अत्यंत सावधगिरीने स्फोटके बाहेर काढून परिसर सुरक्षित केला. कारवाईत जिलेटिनच्या ९ बॉक्समधील १,८०० कांड्या, इलेक्ट्रिक, नॉन-इलेक्ट्रिक व ऑर्डिनरी डेटोनेटर्स, सेफ्टी फ्युज, दोन बुलेरो वाहने आणि टाटा कंपनीचा एक बंदिस्त टेम्पो असा एकूण १७.०९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेला स्फोटक साठा सुरक्षिततेच्या दृष्टीने परवानाधारक मॅगझिनमध्ये ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणी विशाल लक्ष्मण जाट (वय ३९), बारुलाल लक्ष्मण जाट आणि शंकर बेनीराम चौधरी यांच्याविरुद्ध स्फोटक पदार्थ अधिनियम, १८८४, स्फोटक पदार्थ अधिनियम, १९०८ तसेच भारतीय न्याय संहिता कलम २८८ अन्वये वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, पोलीस हवालदार अजित करणे, प्रवीण पवार, स्वप्निल दौंड, अमित सपकाळ तसेच वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी कारवाई करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!