नागरिकांच्या समस्या जाणून घेत
खासदार उदयनराजेंनी दिले
तत्काळ कार्यवाहीचे निर्देश
जलमंदिर पॅलेस येथे जनता दरबार
यूपीएससीमध्ये यश मिळवलेल्या अभिषेक नारकर यांचा सत्कार
सातारा : जलमंदिर पॅलेस येथे खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात नागरिक, युवक-युवती तसेच माता-भगिनींशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. उदयनराजे यांच्याकडे अनेकांनी आपल्या भावना आणि विविध प्रश्न मांडले. प्रत्येकाशी आपुलकीने चर्चा करत त्यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी सकारात्मक प्रयत्न करण्यात आले.
यावेळी उदयनराजे यांनी अधिकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. स्थानिक पातळीवरील प्रश्न, विकासकामे आणि जनहिताच्या विविध मुद्द्यांबाबत सूचना व मते जाणून घेण्यात आली.
दरम्यान, सातारा शहरातील मंगळवार पेठ येथील अभिषेक संजय नारकर यांनी यूपीएससी सीएपीएफ (Central Armed Police Force) परीक्षा २०२३ मध्ये अखिल भारतीय स्तरावर २१५ वा क्रमांक मिळवत सहाय्यक कमांडंट (ग्रुप-ए राजपत्रित अधिकारी) पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस अकादमी, मसुरी येथे एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करताना उत्कृष्ट नेमबाज म्हणून त्यांना ‘कमांडंट्स कप’ प्राप्त झाला असून, सध्या ते हिमाचल प्रदेशातील ४३ बटालियनमध्ये सहाय्यक कमांडंट म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल पुढील वाटचालीसाठी उदयनराजे यांनी शुभेच्छा दिल्या.
जनता दरबारात मांडण्यात आलेल्या प्रश्नांबाबत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी तत्काळ संपर्क साधून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांना न्याय, दिलासा आणि योग्य मार्गदर्शन मिळावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
जनतेने दाखविलेला विश्वास, प्रेम आणि पाठिंबा हीच लोकसेवेची खरी प्रेरणा असून, रयतेच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा निर्धार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.


0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!