सातारा–सांगली विधान
परिषद निवडणुकीत
महायुतीत अंतर्गत
धुसफूस?
भाजपविरोधात वातावरण निर्मितीचा प्रयत्न
धैर्यशील कदम यांची मतांसाठी धावपळ
संतोष शिराळे, सातारा : सांगली -सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत मतभेद आणि नाराजीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी "भाजपबरोबर आमची कोणतीही बैठक किंवा चर्चा झालेली नाही. येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू अशी आमची परिस्थिती आहे," असे वक्तव्य केल्याने महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.
दरम्यान, महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी दरेगावी जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यामध्ये दरे येथे झालेल्या गुप्त बैठकीत सातारा जिल्हा परिषद सत्तासंघर्षानंतर पुढील राजकीय भूमिका आणि विधान परिषद निवडणुकीतील रणनीतीवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
सातारा आणि सांगली जिल्ह्यात सत्ता असूनही भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत विजयासाठी मोठी धावपळ करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विरोधक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि काँग्रेसने सत्ताधाऱ्यांच्या अंतर्गत मतभेदांवर, जिल्हा परिषद सत्तासंघर्षावर आणि विविध मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेत वातावरणनिर्मिती केली आहे.
सातारा जिल्हा परिषद सत्तास्थापनेदरम्यान शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्यांची झालेली कथित फरफट कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागल्याची चर्चा असून, त्याचा परिणाम विधान परिषद निवडणुकीत दिसू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर धैर्यशील कदम यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीगाठी वाढवल्या असून, नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपचे वरिष्ठ नेतेही सातारा आणि सांगली जिल्ह्यांत दौरे, मेळावे आणि बैठका घेऊन महायुतीतील एकमत कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.
मतांची बेरीज तुलनेने कमी असतानाही विरोधी महाविकास आघाडीने आक्रमक प्रचार, सत्ताधाऱ्यांवरील टीका आणि स्थानिक पातळीवरील नाराजी या मुद्द्यांवर वातावरणनिर्मिती करण्यात आघाडी घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे भाजपला केवळ विरोधकांशीच नव्हे तर महायुतीतील असंतोषाशीही सामना करावा लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आता मतदानाच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील नाराजी खरोखरच मतांमध्ये व्यक्त होणार का, की सर्व घटक पक्ष एकत्र येऊन भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांना साथ देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!