कवी विक्रम शिंदे यांची
अखिल भारतीय मराठी
साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र
राज्य सरचिटणीसपदी निवड
रहिमतपूर | प्रतिनिधी
मराठी साहित्यविश्वात उल्लेखनीय योगदान देणारे वेळू (ता. कोरेगाव) येथील प्रसिद्ध कवी, लेखक, संपादक व प्रकाशक विक्रम मालन आप्पासो शिंदे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. ही माहिती परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी दिली.
यावेळी बोलताना डॉ. गोरे यांनी, "मराठी साहित्यविश्वात मोलाचे योगदान देणाऱ्या लेखक आणि कवींना साहित्यसेवेतील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळायला हव्यात. तसेच साहित्य क्षेत्रात युवा लेखकांचे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे," असे मत व्यक्त केले.
यावेळी परिषदेच्या उपाध्यक्षा शुभांगीकीताई काळभोर, महाराष्ट्र प्रदेश संघटक अमोल कुंभार, पुणे जिल्हाध्यक्ष रमेश रेडेकर, पश्चिम महाराष्ट्र युवा प्रदेशाध्यक्ष ॲड. सुमेध गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी विक्रम मालन शिंदे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विक्रम मालन शिंदे यांनी आपल्या प्रभावी कवितांमधून कामगार, कष्टकरी आणि विविध सामाजिक प्रश्नांना समर्थपणे वाचा फोडली आहे. 'श्वास ओला', 'अस्वस्थ', 'ज्ञानज्योत' आणि 'अक्षरदीप' हे त्यांचे प्रकाशित साहित्यसंग्रह साहित्यप्रेमींमध्ये विशेष लोकप्रिय आहेत.
साहित्य संमेलनांच्या आयोजनातून कष्टकरी आणि नवोदित साहित्यिकांचे दर्जेदार लेखन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर ४० हून अधिक प्रकाशन संस्था आणि साहित्य संस्थांची स्थापना झाली असून, अनेक युवकांना कवी, लेखक, संपादक आणि प्रकाशक म्हणून घडविण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
कवी, लेखक, संपादक, प्रकाशक आणि साहित्य चळवळीला नवी दिशा देणारे सर्वसमावेशक कार्यकर्ते म्हणून विक्रम मालन आप्पासो शिंदे यांची राज्यभर ओळख निर्माण झाली असून, त्यांच्या या निवडीमुळे साहित्य क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!