तब्बल १८.६४ लाखांचा स्फोटकांचा साठा जप्त, सातारा पोलिसांची मोठी कारवाई; तिघांना अटक

तब्बल १८.६४ लाखांचा

स्फोटकांचा साठा जप्त

सातारा पोलिसांची मोठी कारवाई

तिघांना अटक,एका संशयिताचा शोध सुरू 

संतोष शिराळे, सातारा | 

सातारा जिल्ह्यात बेकायदेशीररित्या स्फोटकांचा साठा करून त्याची विक्री करणाऱ्या टोळीविरुद्ध सातारा पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन स्वतंत्र छाप्यांमध्ये जिलेटीन कांड्या, डिटोनेटर्स, अमोनियम नायट्रेटसह तब्बल १८ लाख ६४ हजार १८५ किमतीचा स्फोटकसाठा जप्त केला आहे. या कारवाईत आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून एका संशयिताचा शोध सुरू आहे.

पोलीस अधीक्षक निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली बेकायदेशीर स्फोटकांचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती.

खिंडवाडीतील दगड खाणीत पहिला छापा

२५ जून रोजी सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खिंडवाडी येथील दगड खाणीत उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे व पथकाने छापा टाकला. लोखंडी कंटेनर वाहनामध्ये ४८० किलो अमोनियम नायट्रेट, २,४२३ जिलेटीन कांड्या आणि १,८९० डिटोनेटर्स असा १,५४,२८५ किमतीचा स्फोटक साठा आढळून आला. या प्रकरणी शिवराज बलदेव चौधरी (वय ५०) याला अटक करण्यात आली असून त्याच्यासह विशाल जाट, बाबुलाल जाट आणि शंकर बेनीराम चौधरी यांच्याविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मायणी परिसरात दुसरा छापा

तपासादरम्यान विशाल जाट आणि बाबुलाल जाट हे मायणी (गरवारे वस्ती) परिसरात टाटा व्हॅन आणि दोन बोलेरो वाहनांतून स्फोटकांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि वडूज पोलिसांनी संयुक्त कारवाई करून तीन वाहनांची झडती घेतली.

यावेळी १,८०० जिलेटीन कांड्या, विविध प्रकारचे इलेक्ट्रिक, नॉन-इलेक्ट्रिक व ऑर्डिनरी डिटोनेटर्स, कॉर्टेक्स आणि सेफ्टी फ्यूज असा १७,०९,९०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी विशाल जाट आणि बाबुलाल जाट यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर शंकर बेनीराम चौधरी याचा शोध सुरू आहे. दोन्ही गुन्ह्यांचा परस्पर संबंध उघड झाला असून अटक आरोपींचा सातारा शहरातील गुन्ह्यातही सहभाग निष्पन्न झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सातारा पोलीस करत आहेत.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे, पोलीस निरीक्षक निलेश तांबे, वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा शहर व सातारा तालुका पोलीस, बीडीडीएस पथक आणि फॉरेन्सिक युनिट यांच्या संयुक्त सहभागातून करण्यात आली. कारवाई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पोलीस अधीक्षक निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments