जावळी बँकेच्या ५३ व्या
वार्षिक सभेसाठी
सभासदांपेक्षा लाभार्थीच
मुंबईला रवाना
बँकेच्या कारभारावर विरोधकांचे प्रश्नचिन्ह
अजित जगताप, सातारा : सर्वसामान्य सातारकरांची अर्थवाहिनी म्हणून ५३ वर्षांपूर्वी ह.भ.प. दत्तात्रय महाराज कळंबे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँकेच्या ५३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वीच बँकेच्या कारभारावरून विरोधकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. सभासदांपेक्षा लाभार्थींची संख्या वाढल्याची टीका करत, त्यांच्यासाठी सुखसोयी व वाहनांची व्यवस्था केल्याने मोठ्या संख्येने लाभार्थी मुंबईकडे रवाना झाल्याचा दावा बँकेच्या काही हितचिंतकांनी केला आहे.
रविवार, २१ जून रोजी सकाळी १० वाजता मुंबईतील दादर येथे होणाऱ्या वार्षिक सभेमध्ये मागील सभेच्या इतिवृत्ताला मंजुरी, ३१ मार्च २०२६ अखेरच्या आर्थिक वर्षातील ताळेबंद, नफा-तोटा पत्रक, संचालक मंडळाचा अहवाल, नफ्याचे विभाजन, लाभांश जाहीर करणे, वैधानिक लेखापरीक्षकांची नियुक्ती व पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकास मंजुरी आदी विषयांवर चर्चा होणार आहे.
बँकेच्या वार्षिक अहवालानुसार कर्जवाटप ६७३.६२ कोटी रुपये, एकूण गुंतवणूक ४१८.५७ कोटी रुपये, स्वतःचे भांडवल व निधी १४४.६२ कोटी रुपये, तर निव्वळ नफा १०.४० कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
दरम्यान, आगामी संचालक मंडळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरबीआयच्या नव्या निकषांमुळे सर्वसामान्य सभासदांसाठी संचालकपदाचे दार जवळपास बंद झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. उमेदवाराकडे किमान २५ ते ५० हजार रुपयांच्या मूल्याचे शेअर्स तसेच किमान ५० हजार रुपयांची मुदत ठेव दोन वर्षांपासून अखंडित असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवार कर्जदार नसावा किंवा जामीन राहिल्यास संबंधित कर्ज थकीत नसावे, अशी अटही आहे.
या नियमांमुळे कष्टकरी, हातगाडी व्यावसायिक, माथाडी कामगार व सामान्य सभासदांना संचालक होणे आता केवळ स्वप्न ठरणार असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. मुख्य कार्यालयातून निवडणूक नियमावलीची प्रत पाहण्यापलीकडे सामान्य सभासदांच्या हातात काहीच राहिले नसल्याची भावना व्यक्त होत आहे.
वार्षिक सभेला काही मोजके सभासदच उपस्थित राहतात आणि सत्ताधारी संचालकांच्या कारभाराला साथ देणाऱ्यांसाठीच ही सभा असल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे. भविष्यात विरोधकांना रोखण्यासाठी आणखी कठोर आर्थिक अटी लादल्या गेल्या तर आश्चर्य वाटणार नाही, अशा प्रतिक्रिया काही सभासदांनी व्यक्त केल्या आहेत.
जावळी बँकेच्या प्रगतीपेक्षा वार्षिक सभेच्या निमित्ताने काही लाभार्थींनाच लाभ मिळत असल्याने बँकेच्या वस्तुस्थितीवर कोणीही बोलण्यास धजावत नसल्याचा आरोपही करण्यात येत आहे. त्यामुळे अभ्यासू व नाराज सभासदांनी स्वतंत्र प्रतिवार्षिक सभा घेऊन बँकेच्या कारभाराची वस्तुस्थिती सभासदांसमोर मांडावी, अशी मागणी पुढे येत आहे.
ह.भ.प. दत्तात्रय महाराज कळंबे यांच्या तसबिरीचे पूजन केले जात असले तरी त्यांचे विचार मात्र पायदळी तुडवले जात असल्याची खंत काही सभासदांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर व्यक्त केली आहे. दरम्यान, वार्षिक सभा संपल्यानंतर सभासदांकडून व्यक्त होणाऱ्या मनोगतांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!